Kiran Mane : सध्या संपूर्ण महाराष्ट्र हा विठुरायाच्या नामघोषणात न्हाऊन निघतोय. वर्षभर ज्या सोहळ्याची अवघा महाराष्ट्र आतुरतेने वाट पाहतो तो सोहळा अगदी काही तासांवर येऊन ठेपलाय. आपल्याला लाभलेल्या संत परंपरेविषयी अनेकदा बोललं जातं. पण महाराष्ट्राच्या या मातीत असे अनेक संत होऊन गेले ज्यांचा परिचय कधी आपल्याला झाला नाही. त्यामुळे आषाढी एकादशीचं (Ashadhi Ekadashi) औचित्य साधून किरण माने (Kiran Mane) यांनी अशाच संतांवर खास पोस्ट केल्या आहेत.
नुकतीच त्यांनी संत सेना न्हावी यांच्यावर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे. अनेक गोष्टी त्यांनी या पोस्टच्या माध्यमातून मांडल्या आहेत. संत नामदेवांची मध्यप्रदेशात संत सेना यांची ओळख झाली. तेव्हाच्या अनिष्ट रुढी परंपरांविषयी त्यांची भूमिका काय होती, याचं देखील वर्णन त्यांनी त्यांच्या पोस्टमधून केलंय.
किरण माने यांनी काय म्हटलं?
किरण माने यांनी त्यांच्या पोस्टची सरुवात करताना म्हटलं की, 'जातपात, उच्चनीच सगळं पुसून माणसाला माणूस बनवायची धडपड म्हणजे 'वारी' ! आपल्या संतांनी भेदाभेद, वर्चस्ववादाविरोधात केलेला खतरनाक विद्रोह म्हणजे 'वारकरी संप्रदाय.' अशा विद्रोही संतांच्या मांदियाळीतला सुरूवातीच्या काळातला निडर हिरो होता - 'सेना न्हावी' ! संत नामदेवांनी हे अनमोल रत्न मध्यप्रदेशातल्या बांधवगड संस्थानातनं शोधून काढलं. संत सेना यांनी आपल्या परखड, रोखठोक शब्दांनी ब्राह्मण्यवादी व्यवस्थेला मुळापास्नं हादरे दिले.'
पुढे त्यांनी म्हटलं की, त्यावेळी उच्छाद मांडलेल्या विषारी वैदिक पिलावळीला त्यांनी आल्याआल्या इशारा दिला,"आम्ही वारीक वारीक । करू हजामत बारीक ।। विवेक दर्पण आयना दाऊ । वैराग्य चिमटा हालऊ ।। उदक शांती डोई घोळू । अहंकाराची शेंडी पिळू ।। भावार्थाच्या बगला झाडू । काम क्रोध नखे काढू ।। चौवर्णा देऊनी हात । सेना राहिला निवांत ।।"
धर्माचे थोतांड मांडून स्वत:चे पोट भरणारी बांडगुळं त्यांना ट्रोल करू लागली. पण सेना महाराज मागं हटले नाहीत. आपल्या धारदार शब्दांच्या वस्तार्यानं त्या ट्रोलर्सची लै बेक्कार भादरायला सुरूवात केली,"धर्माचे थोतांड । करुनि भरी पोट । भार्या मुले मठ । मजा करी ।। पुराण सांगता । नागावानी डोले । अविर्भाव फोल । करीतसे ।। सेना म्हणे ऐशा । दांभिका भजती । दोघेही जाताती । अधोगती ।।" असंही त्यांनी म्हटलं आहे.
ब्राह्मण्यवादी व्यवस्थेनं बहुजनांना दाखवलेली 'पाप पुण्या'ची भिती उडवून लावत सेना महाराज सांगायचे, पुण्यासाठी यज्ञयाग, अभिषेक करून ब्राह्मणाला दक्षिणा देण्याची अजिबात गरज नाही... माणुसकीच्या नात्यानं परोपकार करा, पुण्य मिळेल... "करीता परोपकार । त्याच्या पुण्या नाही पार ।। करिता परपीडा । त्याच्या पायी नाही जोडा ।।"
'धर्मोपदेश' करून अडाणी कष्टकरी जनतेला भुलवणार्या पाखंडी बुवाबापूंचे बुरखे फाडताना ते म्हणतात, "धर्म उपदेशी मागेल जो अर्धी । तयाचिया प्रीती भजू नये ।। थाटमाट करुनि लुबाडीत रांडा । ऐसिया पाखंडा भुलू नये ।।"एक लक्षात घ्या, हे विचार सेना महाराजांनी मांडलेत तब्बल आठशे वर्षांपुर्वी ! त्याकाळात बहुजनांना, "उपास तापास नका करू व्रत । राहा धरुनी चित्त हरी पायी ।।" असा साधासोपा धर्म शिकवणं म्हणजे खायचं काम नव्हतं राजेहो. विशेष म्हणजे शिखांचा पवित्र धर्मग्रंथ, ‘गुरुग्रंथसाहिब’मध्ये संत सेनांच्या एका अभंगाचा समावेश आहे, अशी माहिती देखील त्यांच्या पोस्टमधून त्यांनी दिली आहे.
"जेथें वेदा न कळे पार । पुराणासी अगोचर ।। तो हा पंढरीराणा । बहु आवडतो मना ।। सहा शास्त्र शिणलीं । मन मौनचि राहिली ।। सेना म्हणे मायबाप । उभा कटी ठेउनी हात ।।" कमरेवर हात ठेवून उभा असलेला आमचा बाप तुमच्या चार वेद, अठरा पुराणं, सहा शास्त्रांपेक्षा लै मोठ्ठा हाय हे ठणकावून सांगणार्या सेना महाराजांना त्रिवार वंदन, असं म्हणत त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.