Kiran Mane : ‘मुलगी झाली हो’ (Mulgi Zali Ho) मालिकेतून काढून टाकल्यानंतर, मालिकेत ‘विलास पाटील’ ही भूमिका साकारणारे अभिनेते किरण माने (Kiran Mane) प्रचंड चर्चेत आले आहेत. राजकीय पोस्ट केल्यामुळे मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवला गेला, असा आरोप किरण माने यांनी केला होता. या प्रकरणानंतर किरण माने हे नाव प्रचंड चर्चेत आलं. या वादावर अद्याप पडदा पडत नाही, तोच आता एका कमेंटमुळे किरण माने पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.


मराठी मनोरंजन विश्वाची लाडकी अप्सरा अर्थात आभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने नुकतीच मराठी भाषा दिनानिमित्ताने शुभेच्छा देणारी एक पोस्ट शेअर केली होती. मात्र, या पोस्टवर खोचक कमेंट करत किरण माने यांनी अभिनेत्रीला खडे बोल सुनावले. त्यांची ही कमेंट प्रचंड चर्चेत आली आहे. त्यांच्या या कमेंटनंतर सोनालीने ही पोस्ट तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून डिलीट केली आहे.


नेमकं प्रकरण काय?


अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने सोशल मीडियावर मराठी भाषा दिनानिमित्ताने शुभेच्छा देणारी पोस्ट लिहिली होती. या पोस्टमध्ये तिने प्रमाण भाषा आणि बोली भाषा यातील फरक खोचक शब्दांत लिहिला होता. ‘न आणि ण.. श आणि ष…ळ आणि ड, चांदणी मधील च आणि चंद्रामधील च, जहाजमधील ज आणि जीवनामधील ज यांच्या उच्चारातील फरक कळणाऱ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा! बाकीच्यांना मराठी भाशा दिणाच्या मणापासून षुभेच्छा!!!’ अशी ही पोस्ट होती.




काय म्हणाले किरण माने?


किरण माने हे त्यांच्या अस्सल सातारी भाषेतील पोस्टसाठी देखील प्रसिद्ध आहेत. सोनाली कुलकर्णीची ही पोस्ट पाहून किरण माने यांनी त्यावर कमेंट करत अभिनेत्रीला चान्गेल्च बोल सुनावले आहेत. 'उच्चार चुकवणाऱ्यांनी ‘डॅन्स’ची एक लाखाची सुपारी दिली की पारावर आणि ट्रालिवरबी नाचायचं… आणि इकडं येऊन त्यांची टर उडवायची हे बरे न्हवं. अस्सल सातारीत बोलनार या कायम ण ला न म्हन्नार या आमच्या लाडक्या राज्यांच्या वाढदिवसाला परवा परवाच साताऱ्यात नाचून गेल्यात म्याडम…या नट्यांना प्रमाणभाषेत बोलनारं कुत्रंबी ईचारत नाय. सगळं यश मिळवलंय ते ग्रामीन भूमिका करूनच. लिश्ट काढा हिट पिच्चरची’, अशी कमेंट त्यांनी या पोस्टवर केली होती. यानंतर तिने ही पोस्ट सोशल मीडियावरून डिलीट केली आहे.


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha