Ladki Bahin Yojana : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये (Maharashtra Assembly Elections 2024) एका मुद्दा तुफान गाजला. याच मुद्द्यामुळे महायुतीला विधानसभा निवडणुकांमध्ये विजय देखील मिळाला. महायुतीच्या सरकारने विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर लाडकी बहिण योजना (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) आणली. याच योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात आले. निवडणुकांच्या प्रचारामध्येही या योजनेचा जोरदार प्रचार करण्यात आला. तर विरोधकांनी मात्र या योजनेवर कडकडीत टीकास्त्रही सोडलं. निवडणुकांनंतरही याच योजनेवरुन आरोप-प्रत्यारोपांचं देणंघेणं अद्यापही सुरु आहे. त्यातच ठाकरे गटाचे नेते आणि अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांनी नुकतीच या योजनेवरुन खरमरीत पोस्ट केली आहे.
किरण माने हे त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून बरेच सक्रिय असतात. अनेक मुद्द्यांवर ते त्यांच्या सोशल मीडियावरुन व्यक्त होत असतात. या निवडणुकांमध्ये त्यांनी महाविकास आघाडीसाठी प्रचारासाठी महाराष्ट्र देखील पिंजून काढला. महायुतीच्या विजयानंतर ईव्हीएमच्या मुद्द्यावरही त्यांनी संताप व्यक्त केला होता. त्यानंतर आता त्यांनी लाडकी बहिण योजनेवरुन सत्ताधाऱ्यांवर टीकास्र सोडलं आहे.
किरण माने यांची पोस्ट नेमकी काय?
किरण माने यांनी त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं की, बहिणींना दरमहा दिलेला खाऊ आणि “पैशे आले का?” हे विचारणारा भाऊ… दोन्हीही गुंडाळून डस्टबीन मध्ये फेकून दिलेले आहेत ! काम झाले, विषय संपला. लाडक्या तायांनो, आता रस्त्यारस्त्यावर समोर येणाऱ्या प्रज्वल आणि ब्रिजभूषणपासून तुम्ही स्वतःच स्वतःचं रक्षण करा !
अर्जांची छाननी होणार का? नेमकी काय चर्चा आहे?
लाडकी बहीण योजनेअंतर्गत काही महिलांना निकषात बसत नसूनही प्रतिमहिना 1500 रुपये लाभ दिला जात आहे, अशा तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे तक्रार आलेल्या अर्जांची नव्याने छाननी केली जाणार आहे. तसेच अर्जामध्ये तफावत आढळल्यास, चुकीची माहिती दिली गेली असल्यास अर्ज बाद केला जाईल, असे सांगण्यात येत आहे. यासह अर्जदार महिला सरकारने घालून दिलेल्या नियमांत बसत नसेल, तरीदेखील अर्ज बाद केला जाईल, असे सांगितल जात आहे. पण अद्याप तसा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, असे आदिती तकटकरे यांनी सांगितले आहे.