Khokya Satish Bhosle: भाजप पदाधिकारी (BJP) आणि आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांचा कार्यकर्ता असलेल्या सतीश भोसले सध्या फरार आहे. पण, दुसरीकडे त्याचे कारनामे काही थांबण्याचं नाव घेत नाहीत. अशातच आता या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर येत आहे. सतीश भोसले उर्फ खोक्याला लॉरेन्स बिश्नोईच्या नावाचा वापर करून धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळं वळण मिळणार यात काही शंका नाही.
काही दिवसांपूर्वी शिरुर कासार येथे एका व्यक्तीस बॅटनं मारहाण करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सतीश उर्फ खोक्या भाईनं चक्क परिसरातील हरणांची शिकार करुन त्यांचं मास खाल्ल्याचं आता समोर आलं आहे. त्यानंतर, खोक्याने शेकडो वन्य जीव, हरिण, काळवीट, ससे आणि मोरांची शिकार केली असल्याचा गंभीर आरोप वन्यजीवप्रेमींनी केला आहे. यासोबच हरणांच्या पार्ट्या केल्याचे अवशेषही सापडत असल्याचा दावा त्यांनी केला.
खोक्याला काय धमकी मिळाली?
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाचा वापर करून सतीश भोसले याला धमकी देण्यात आली आहे. बिश्नोईच्या नावानं अज्ञात व्यक्तीकडून दोन दिवसांपूर्वी एक फेसबुक अकाउंट तयार करण्यात आलं. या फेसबुक अकाउंटवरून खोक्या उर्फ सतीश भोसले याला धमकी देण्यात आली आहे. खोक्याला लवकरात लवकर जेलमध्ये टाका अशी मागणी या अकाउंटवरून करण्यात आली आहे. हरिण आमचं दैवत आहे, त्यामुळे खोक्या माफीच्या लायकीचा नाही, असं या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.
खोक्या फरार, वन विभागाचा कसून तपास सुरू
खोक्या भोसलेच्या मुस्क्या आवळण्यासाठी वन विभागाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. वन विभागाच्या (Forest) अधिकाऱ्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली असून घटनेची माहिती घेत आहे. घटनास्थळावर पंचनामा करून हरणाची सापडलेली कवटी आणि हाडकं तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात येणार आहेत. सतीश भोसलेने अनेक काळे कारनामे केले आहेत, त्याने अनेक मुक्या प्राण्यांचे जीव घेतल्याचे देखील समोर आले आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
बीडमधील खोक्याच्या मुसक्या आवळणार, वन विभाग स्पॉटवर; हरणाची कवटी अन् हाडकं घेतली ताब्यात