IND vs NZ Final Champions Trophy 2025 Axar Patel profile : भारताचा स्टार फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीच्या अलिकडच्या कामगिरीमुळे डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेलला प्रसिद्धी मिळवण्याची संधी मिळालेली नाही. भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीपर्यंतच्या प्रवासापासून ते त्याआधीपर्यंत, अक्षरने फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीमध्ये संघासाठी सातत्याने महत्त्वाचे योगदान दिले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ग्रुप स्टेज सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध भारताच्या विजयाच्या मध्ये  केन विल्यमसन उभा होता, तेव्हा अक्षर पटेलने त्याची विकेट घेतली आणि पुन्हा एकदा सिद्ध केले की, तो भारतीय संघाचा नवा तारणहार आहे. न्यूझीलंडविरुद्ध अक्षरच्या 10 षटकांच्या कोट्यातील हा शेवटचा चेंडू होता ज्याने सामना भारताच्या बाजूने फिरवला. लोकांनी याकडेही फारसे लक्ष दिले नाही, कारण वरुण चक्रवर्तीने या सामन्यात पाच विकेट घेऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले. 

एकेकाळी, रवींद्र जडेजा सारख्याच असल्यामुळे अक्षरला फारशा संधी मिळाल्या नाहीत. जडेजाच्या सावलीतून बाहेर येण्यासाठी त्याला संघर्ष करावा लागला. 2022 पासून त्याने स्वतःसाठी मार्ग तयार करण्यासाठी त्याच्या फलंदाजीवर काम केले आणि जेव्हा संघ व्यवस्थापनाने त्याला पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवले तेव्हा तो अपेक्षांवर पूर्णपणे खरा उतरला. पण तुम्हाला माहीत आहे का अक्षर पटेलला कधीच क्रिकेटर व्हायचे नव्हते. तो अभ्यासात खूप हुशार होता आणि त्याचे स्वप्न मेकॅनिकल इंजिनिअर होण्याचे होते, पण नियतीने त्याच्यासाठी काहीतरी वेगळेच ठेवले होते.

जेव्हा अक्षर नववीत होता, तेव्हा त्याचा मित्र धीरेन कंसाराने त्याची क्षमता ओळखली आणि त्याला आंतरशालेय स्पर्धांमध्ये खेळण्यासाठी सांगितले. तेव्हापासून अक्षरची क्रिकेट खेळण्याची आवड वाढली. पण, अक्षर लहानपणी नाजूक आणि बारीक होता. ज्यासाठी त्याचे आई-वडिल पण खूप काळजीत असायचे. म्हणून त्याच्या वडिलांनी त्याला जिममध्ये भरती करायला लावले, यानंतर त्याने तंदुरुस्त राहण्यासाठी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. मग त्याने क्रिकेट अकादमीमध्ये प्रवेश घेतला. जिथे त्याने पूर्ण मेहनत आणि आपले करिअर घडवले.

अक्षर पटेलची देशांतर्गत क्रिकेट कारकीर्द

2012 मध्ये, अक्षर पटेलने लिस्ट ए क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने विजय हजारे ट्रॉफीमध्ये आपला पहिला सामना 22 फेब्रुवारी 2010 रोजी महाराष्ट्राविरुद्ध खेळला. यानंतर, 2 नोव्हेंबर 2012 रोजी, त्याने रणजी ट्रॉफीमध्ये मध्य प्रदेशविरुद्ध प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पण, 2013 च्या हंगामात अक्षरने उत्कृष्ट कामगिरी केली आणि सर्वांना प्रभावित केले. त्या हंगामात त्याने 7 सामन्यांमध्ये 46.12 च्या सरासरीने 369 धावा केल्या. याशिवाय त्याने 29 विकेट्सही घेतल्या. देशांतर्गत क्रिकेटमधील त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे, 2014 मध्ये त्याला अंडर-19 क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

आयपीएलमध्ये चमकल्यामुळे टीम इंडिया एन्ट्री

2013 मध्ये इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) फ्रँचायझी मुंबई इंडियन्सने अक्षर पटेलला करारबद्ध केले होते, परंतु त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. 2014 मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबने अक्षर पटेलला त्यांच्या संघात समाविष्ट केले. त्या हंगामात अक्षरनेही खूप चांगली कामगिरी केली आणि 17 विकेट्स घेतल्या. 2014 च्या आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर, अक्षर पटेलला बांगलादेश दौऱ्यासाठी भारतीय एकदिवसीय संघात स्थान मिळाले. त्याने शेर-ए-बांगला राष्ट्रीय स्टेडियमवर एकदिवसीय सामन्यात पदार्पण केले आणि 59 धावा देऊन एक विकेट घेतली. 2015 च्या क्रिकेट वर्ल्ड कपसाठी भारताच्या 15 सदस्यीय संघात अक्षर पटेल देखील होता. पण, त्याला स्पर्धेत एकही सामना मिळाला नाही आणि त्याला बेंचवर बसावे लागले. अक्षर पटेलने 17 जुलै 2015 रोजी झिम्बाब्वेविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. यानंतर, त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतही चमकदार कामगिरी केली. 2019 च्या क्रिकेट वर्ल्ड कपसाठी भारतीय संघात त्याला स्टँडबाय खेळाडू म्हणून निवडण्यात आले. 

जानेवारी 2021 मध्ये, इंग्लंड दौऱ्यासाठी रवींद्र जडेजाच्या जागी अक्षर पटेलची भारतीय कसोटी संघात निवड झाली. त्याच्या कसोटी पदार्पणात अक्षरने शानदार कामगिरी केली आणि संपूर्ण सामन्यात 7 विकेट्स घेतल्या. पण, बॅटने त्याने दोन्ही डावात फक्त 5 आणि 7 धावा केल्या. दुसऱ्या सामन्यात त्याने अकरा विकेट्स घेत मागील कामगिरीत चांगली कामगिरी केली परंतु फलंदाजीने त्याला एकही धाव करता आली नाही. आणि मालिकेतील शेवटच्या सामन्यात, नरेंद्र मोदी स्टेडियमवर अक्षरने आणखी एक शानदार नऊ विकेट्स घेतल्या आणि 43 धावा केल्या. 2023 च्या वर्ल्ड कप 2023 साठी अक्षर पटेलची भारतीय संघात निवड झाली होती, परंतु नंतर त्याच्या जागी अनुभवी ऑफ-स्पिनर रविचंद्रन अश्विनने स्थान मिळवले.

चॅम्पियन्स ट्रॉफीत मधल्या फळीत टीम इंडियाची बनला ताकद

चॅम्पियन्स ट्रॉफीत अनुभवी राहुलऐवजी अक्षरला पाचव्या क्रमांकावर पाठवण्याचा निर्णय संघ व्यवस्थापनी घेतला. गेल्या वर्षी कोलंबो येथे श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यापासून अक्षर नियमितपणे पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करत आहे. पहिल्याच सामन्यात 44 धावा काढून त्याने दाखवून दिले की तो या आव्हानासाठी पूर्णपणे तयार आहे. यानंतर, पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना, अक्षरने 52, नाबाद 41, 8, 3 नाबाद , 42 आणि 27 धावा केल्या. कठीण परिस्थितीत त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली. यामुळे भारताला मधल्या फळीत तो टीम इंडियाची ताकद बनला.