Ketaki Chitale : ॲट्रॉसिटी कायद्या विषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) आणि संयोजक बाजीराव धर्माधिकारी यांच्या विरोधात परळी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे. 5 फेब्रुवारी रोजी परळीत राज्यस्तरीय ब्राह्मण ऐक्य परिषद संपन्न झाली होती .या परिषदेत बोलताना केतकी चितळे हिने ॲट्रॉसिटी विषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं.
परळीतील परळी शहर पोलीस तसेच उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन हा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती. अखेर चार दिवसानंतर वंचित युवा बहुजन आघाडीचे शहर अध्यक्ष प्रेम जगतकर यांच्या फिर्यादीवरून ब्राह्मण ऐक्य परिषदेचे संयोजक बाजीराव धर्माधिकारी आणि केतकी चितळेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यांच्या विरोधात विरोधात कलम 295 (अ) तसेच कलम 505 (2) अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. केतकीच्या या वक्तव्यामुळे सध्या राज्यभरातून रोष व्यक्त केला जात असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे आता केतकीवर काय कारवाई केली जाईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
केतकीनं नेमकं काय म्हटलं?
केतकी चितळे म्हणाली,"गेल्या पाच वर्षात किती अॅट्रोसिटी केस आहेत. त्यातल्या ब्राह्मणांच्या विरोधात किती आहेत आणि प्रत्येक जातीविरोधात किती आहेत हे शोधा. हे अख्ख रॅकेट आहे. ज्याबद्दल तुम्हाला कल्पनाही नाही. एक वकीलांनी गेल्या 15-20 वर्षात 62 अॅट्रॉसिटी केसेस टाकल्या आहेत. यातील 13-15 ठिकाणी त्याच्यांसोबत विटनेस एकच आहे. असे अनेक वकील आहेत. हे अख्ख रॅकेट असून त्यांचं जोरात काम सुरू आहे. त्यामुळे अॅट्रोसिटी कायदा रद्द करावा".
अॅट्रोसिटी कायद्याअंतर्गत केतकी चितळेला झालेली अटक
अॅट्रोसिटी कायद्याअंतर्गत 2022 मध्ये केतकी चितळेला अटक झाली होती. ठाणे सत्र न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. 2020 मध्ये अॅट्रोसिटी कायद्याअंतर्गत केतकी चितळे विरोधात गुन्हा दाखल झाला होता. तिने अनुसूचित जातींतीत मंडळींविरोधात आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली होती.
केतकी चितळे कोण आहे?
'तुझं माझं ब्रेकअप' या मालिकेच्या माध्यमातून केतकी घराघरांत पोहोचली होती. त्यानंतर वादग्रस्त वक्तव्यांमुळे ती नेहमीच चर्चेत राहिली आहे. गेल्या काही वर्षापासून केतकीला अपस्मार हा आजार आहे. या आजारावर केतकी वेगवेगळ्या मेडिकल ट्रीटमेंट घेत आहे. त्यासंदर्भातील फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते.
ही बातमी वाचा :
Ketaki Chitale : "अॅट्रोसिटी कायदा रद्द करावा"; ब्राह्मण ऐक्य परिषदेत केतकी चितळेची मागणी