Karmaveer Bhaurao Patil Biopic Karmveeranyan : महाराष्ट्रातील खेडापाड्यातर, बहुजन-वंचित समाजामध्ये शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचवण्याचा प्रयत्न करणारे कर्मवीर भाऊराव पाटील (Karmaveer Bhaurao Patil) यांचा जीवनपट आता रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. 'कर्मवीरायण' या चित्रपटातून कर्मवीर अण्णांचा जीवनपट साकारला जाणार आहे. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून कर्मवीर अण्णांनी राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना शिक्षण दिले. कर्मवीरांचा जीवनपट मांडणाऱ्या "कर्मवीरायण" या चित्रपटाने अनेक चित्रपट महोत्सव गाजवल्यानंतर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
महाराष्ट्राच्या खेडोपाडी शिक्षणाचा प्रसार करणाऱ्या, रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून गरीब, गरजू, कष्टकऱ्यांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणारे शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांचं जीवनचरित्र आता मोठ्या पडद्यावर येत आहे. अभिनेते किशोर कदम यांनी कर्मवीरांची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट 17 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
ट्रेलरमध्ये काय?
कर्मवीर भाऊराव पाटील ह्यांनी छत्रपती शाहू महाराजांचा वारसा जपत वसतिगृह सुरू केली. त्या वसतिगृहात त्यांनी शिक्षण घेऊ इच्छित असणाऱ्या मुलांना राहण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली. त्यामुळे सर्व जातीधर्मातील मुले एका छताखाली गुण्यागोविंदाने शिकू लागली. उच्चवर्णीय आणि उच्चवर्गीयांपर्यंतच मर्यादित असलेले शिक्षण त्यांनी तळागाळातील समाजापर्यंत पोहोचवले. त्यांनी सुरु केलेल्या शाहू बोर्डिंग हाउसला महात्मा गांधी ह्यांनीही भेट दिली होती.समाजाला खऱ्या अर्थाने समानतेची ओळख करून देण्यात एक अत्यंत महत्वाची भूमिका कर्मवीर भाऊराव पाटील यांचा थक्क करणारा प्रवास आपल्याला "कर्मवीरायण" या चित्रपटातून पाहता येणार आहे. ट्रेलरमध्ये किशोर कदम यांच्यासह सुहास शिरसाट, उदय टिकेकर, राहुल सोलापूरकर आदी कलाकार दिसत आहेत.
चित्रपटात कोणते कलाकार?
ट्रान्सएफएक्स स्टुडिओज प्रा. लि. यांनी निर्मिती केलेल्या "कर्मवीरायण" चित्रपटाची प्रस्तुती 7 वंडर्सचे पुष्कर मनोहर यांनी केली आहे. धनंजय भावलेकर यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. अनिल सपकाळ आणि धनंजय भावलेकर यांनी चित्रपटाची पटकथा लिहिली आहे. किशोर कदम, सुहास शिरसाट, उपेंद्र लिमये, देविका दफ्तरदार, उषा नाईक अशा दिग्गज कलाकारांचा समावेश या चित्रपटात असणार आहे.