मुंबई : अभिनेता रणवीर सिंहचा (Ranveer singh) बहुप्रतिक्षित चित्रपट '83' नेमका केव्हा प्रदर्शित होणार, याचीच उत्सुकता चाहत्यांमध्ये पाहायला मिळाली. चित्रपटाचा फर्स्ट लूकही चाहत्यांच्या भेटीला आला आहे. पण, चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख मात्र लांबणीवर पडली होती. अखेर या चित्रपटाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. अभिनेता रणवीर सिंहनं स्वत: ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे. आता हा चित्रपट ख्रिसमसच्या दिवशी म्हणजे 25 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे, अशी माहिती अभिनेता रणवीर सिंहनं दिली आहे. 






काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा फर्स्ट लूकही  प्रदर्शित करण्यात आला. फर्स्ट लूकने चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचवली आणि अखेर आता हा चित्रपट यंदाच्याच वर्षी जून महिन्यात प्रदर्शित होणार होता. मात्र कोरोनामुळं पुन्हा तारीख पुढं ढकलली गेली.  अभिनेता रणवीर सिंहने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टनुसार यंदाच्याच वर्षी 4 जूनला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असं सांगण्यात आलं होतं. हा चित्रपट तमिळ, तेलगु, कन्नड, मल्याळम आणि हिंदी या पाच भाषेत प्रदर्शित होणार आहे.


दरम्यान, 1983च्या क्रिकेट विश्वकपच्या अंतिम सामन्यात वेस्ट इंडिजच्या विरूद्ध भारताने दणदणीत विजय मिळवून विश्वचषकावर आपलं नाव कोरलं होतं. याच गोष्टीवर आगामी '83' हा चित्रपट आहे. यामध्ये रणवीर सिंह माजी कर्णधार कपिल देव यांच्या भूमिकेत झळकणार आहे. तर अभिनेत्री दीपिका पादुकोण कपिल देव यांची पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. लग्नानंतर पहिल्यांदाच रणवीर आणि दीपिका स्क्रिन शेअर करणार आहेत. चित्रपटात ताहिर राज भसीन, एमी विर्क, हार्डी संधु आणि चिराग पटेल यांसारख्या अभिनेत्यांचाही समावेश आहे.