Producer Soundarya Jagadish Found Dies : आपल्या सासूच्या निधनाने प्रचंड मानसिक धक्क्यात असलेल्या चित्रपट निर्मात्याचे निधन झाले आहे. त्यांनी गळफास घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. कन्नड चित्रपट निर्माता आणि उद्योगपती सौंदर्या जगदीश यांनी रविवारी अखेरचा श्वास घेतला. सौंदर्या जगदीश हे निर्माते आणि व्यावसायिक होते.
पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी 14 एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास बेंगळुरू येथील महालक्ष्मी लेआउट येथील निवासस्थानी सौंदर्या जगदीश यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. ही आत्महत्या आहे की घातपात आहे? त्यामागील नेमकं कारण काय? अशा वेगवेगळ्या अँगलने पोलिसांकडून तपास सुरू झाला आहे.
जगदीश यांचा जवळचा मित्र श्रेयस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, 'आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर जगदीशचा मृत्यू झाला आहे. आम्ही त्याला तातडीने रुग्णालयात दाखले केले. मात्र, त्याला त्या ठिकाणी मृत घोषित करण्यात आले. जगदीश याला आरोग्यविषयक कोणत्याही समस्या नव्हत्या. या क्षणी तरी आम्ही नेमंक कारण सांगू शकणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बँकेच्या नोटीसमुळे सौंदर्या जगदीश यांचा टोकाचा निर्णय?
जगदीश यांना नुकतीच बँकेने नोटीस पाठवली होती. या नोटीसमुळे त्यांनी आत्महत्या केली का, असे विचारले असता त्यांच्या मित्राने नकारार्थी उत्तर दिले. नोटीसचा आणि आत्महत्येचा काहीही संबंध नाही असेही त्यांनी म्हटले. व्यवसायाशी संबंधित प्रश्न वेगळे आहेत. याबाबत तात्काळ पोलिसांना कळवण्यात आल्याचे श्रेयसने सांगितले. निर्माते सौंदर्य जगदीश यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा दावा करणारे वृत्तही त्यांनी फेटाळून लावले.
सासूच्या निधनाने मानसिक धक्का
रविवारी, 14 एप्रिल रोजी जगदीश यांनी सकाळच्या सुमारास आत्महत्येचा प्रयत्न केला. ही बाब समजताच तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. 'इंडियन एक्स्प्रेस'ने पोलीस अधिकाऱ्यांच्या हवाल्याने सांगितले की, जगदीश यांच्या पत्नीने याबाबत एक तक्रार नोंदवली होती.
नुकतेच काही दिवसांपूर्वी जगदीश यांच्या सासूचे निधन झाले होते. जगदीश आणि त्यांच्या सासूमध्ये चांगले भावनिक बंध जुळले होते. मात्र, त्यांच्या निधनाने जगदीश खचले आणि मानसिक तणावात गेले. काही दिवसांपासून जगदीश हे ताण-तणावावर औषधेदेखील घेत होते.
वादात अडकला होता पब
सौंदर्या जगदीश हे एका पबचे मालक होते. ते चित्रपट निर्माता आणि बांधकाम व्यावसायिक होते. त्याशिवाय त्यांचे इतरही व्यवसाय होते. वृत्तानुसार, काही चित्रपट कलाकार आणि क्रू हे पबमध्ये रात्री उशिरापर्यंत पार्टी करत असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांचा पब अलीकडेच वादात सापडला होता. त्यामुळे त्यांच्या पबचा परवाना तात्पुरत्या स्वरुपात रद्द करण्यात आला होता. याची चिंताही त्यांना सतावत होती.