Kannada actor Darshan Thoogudeepa Arrested :  एका हत्येच्या प्रकरणात दाक्षिणात्य अभिनेत्याला अटक करण्यात आली आहे. बेंगळुरू पोलिसांच्या या कारवाईमुळे सिनेइंडस्ट्रीत खळबळ उडाली आहे.  कन्नड सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता दर्शन याला अटक करण्यात आली (Kannada actor Darshan Thoogudeepa Arrested ). 9 जून रोजी कामाक्षीपाल्या पोलिसांनी अभिनेता दर्शनविरोधात एफआयआर नोंदवला. त्यानंतर हत्या प्रकरणात त्याला म्हैसूर येथील त्याच्या फार्महाऊसमधून अटक करण्यात आली. दर्शन याला बेंगळुरूमध्ये आणण्यात आले.  रेणुकास्वामी नावाच्या एका व्यक्तीच्या हत्याप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. 


वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, पोलिसांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, सध्या दर्शनची चौकशी सुरू आहे. हत्या प्रकरणात एका आरोपीने चौकशीत दर्शनचे नाव घेतले. त्याशिवाय हत्या झालेल्या युवकाच्या आईने देखील तक्रार दाखल केली. त्याआधारे दर्शन अटक करण्यात आली असून त्याची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 


 






10 जणांवर कारवाई, आरोपींनी घेतले दर्शनचे नाव


बेंगळुरूचे पोलीस आयुक्त  बी. दयानंद यांनी सांगितले की, 9 जून रोजी बेंगळुरू पश्चिम डिव्हिजनचे कामाक्षीपाल्या पोलीस ठाण्यात एका हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला.  या हत्या प्रकरणात कन्नड अभिनेता दर्शन याला अटक करण्यात आली. 






दर्शनची  सिने कारकिर्द


दर्शनने 1997  मध्ये 'महाभारत' चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. अभिनेता होण्यापूर्वी त्याने एक वर्ष प्रोजेक्शनिस्ट म्हणून काम केले आणि त्यानंतर सहाय्यक कॅमेरामन म्हणूनही काम केले. सुरुवातीला, दर्शन केवळ चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिकांमध्ये दिसला, परंतु नंतर तो मुख्य अभिनेता म्हणून उदयास आला. आपल्या कारकिर्दीत त्याने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. यामध्ये 'नम्मा प्रीथिया', 'कलासिपल्य', 'गाजा' आणि 'सारथी' सारख्या चित्रपटांचा समावेश आहे.