Maharashtra Premier League, 2024 Matches : कर्णधार राहुल त्रिपाठी (६३धावा) याने केलेल्या अर्धशतकी खेळीसह श्रेयस चव्हाण(४-१४)याने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर कोल्हापूर टस्कर्स संघाने रत्नागिरी जेट्स संघाचा २ धावांनी पराभव केला. कोल्हापूर टस्कर्सचा हा दुसरा विजय ठरला. 


गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर सुरु झालेल्या या स्पर्धेत (MPLT20Tournament) रत्नागिरी जेट्स संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रत्नागिरीच्या गोलंदाजांनी प्रभावी मारा करत कर्णधाराने घेतलेला निर्णय सार्थ ठरविला. हर्ष संघवी(१), अंकित बावणे(२)यांना झटपट बाद करून सलामीची जोडी लवकर तंबूत पाठवली. दिव्यांग हिंगणेकरने अंकित बावणेला, तर प्रदीप दाढेने हर्ष संघवीला झेल बाद केले. योगेश चव्हाणने हे दोन्ही झेल अप्रतिमरीत्या झेलले. त्यानंतर कर्णधार राहुल त्रिपाठीने ३९चेंडूत ६३धावांची आक्रमक खेळी केली. त्यात त्याने ७चौकार व ३ उत्तुंग षटकार खेचले. राहुलला सिद्धार्थ म्हात्रेने ३६चेंडूत १चौकार व ३षटकारासह ४४ धावा काढून साथ दिली. राहुल व सिद्धार्थ यांनी तिसऱ्या विकेटसाठी ३६चेंडूत ५०धावांची भागीदारी करून संघाचा डाव सावरला. पण याचवेळी कर्णधार अझीम काझीने राहुल त्रिपाठीला ६३धावांवर झेल बाद करून त्याचा अडसर दुर केला. पाठोपाठ सिद्धार्थ म्हात्रे चोरटी धाव घेत असताना समन्वयाच्या अभावामुळे धावबाद झाला. त्यानंतर योगेश डोंगरे(नाबाद २८),अनिकेत पोरवाल(१०), श्रीकांत मुंढे(१६धावा)यांनी धावा काढून संघाला २०षटकात ७बाद १६९धावांचे आव्हान उभे केले. रत्नागिरी जेट्सकडून सत्यजीत बच्छावने ३१धावात ३गडी बाद केले. तर, अझीम काझी(१-१७), दिव्यांग हिंगणेकर(१-२२), प्रदीप दाढे(१-१३)यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. 


१७०धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या रत्नागिरी जेट्स संघाला २०षटकात ७बाद १६७धावाच करता आल्या. प्रीतम पाटीलने १६चेंडूत ४चौकार व ३षटकाराच्या मदतीने ३८धावा चोपल्या. प्रीतमने धीरज फटांगरे(१०धावा) च्या साथीत २२चेंडूत ५०धावांची भागीदारी करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. पॉवरप्लेमध्ये पाचव्या षटकात फिरकीपटू श्रेयस चव्हाणने प्रीतम पाटील(३८), धीरज फटांगरे(१०) या सलामी जोडीला बाद करून सामन्यात रंगत निर्माण केली. त्यानंतर कर्णधार अझीम काझीने ३०चेंडूत १चौकार व १षटकारासह ३०धावा, तर दिव्यांग हिंगणेकरने २५चेंडूत २षटकाराच्या मदतीने २४धावा करून संघाची धावगती वाढवण्याचा प्रयत्न केला. पण श्रेयस चव्हाणने पुन्हा एकदा आपल्या फिरकीच्या जाळ्यात अझीम काझीला ३० धावांवर बाद करून रत्नागिरी जेट्सला मोठा धक्का दिला. विजयासाठी रत्नागिरी संघाला २५चेंडूत ५३धावांची आवश्यकता होती. सातव्या क्रमांकावर फलंदाजीस उतरलेल्या निखिल नाईकने १७चेंडूत नाबाद ३७धावांची केलेली धडाकेबाज खेळी अपुरी ठरली. त्यात त्याने ४ उत्तुंग षटकार मारले. शेवटच्या षटकात ६चेंडूत २४धावांची आवश्यकता असून निखिल नाईकने ३षटकार मारून सामन्याला कलाटणी देण्याचा प्रयत्न केला. पण तो यशस्वी ठरला नाही. कोल्हापूर टस्कर्सच्या श्रेयस चव्हाणने १४धावात ४ गडी बाद करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याला श्रीकांत मुंढे(१-२५), मनोज यादव(१-४२)यांनी प्रत्येकी एक गडी बाद करून साथ दिली. 






संक्षिप्त धावफलक:
पुनीत बालन ग्रुप कोल्हापूर टस्कर्स: २०षटकात ७बाद १६९(राहुल त्रिपाठी ६३(३९,७x४,३x६), सिद्धार्थ म्हात्रे ४४(३६,१x४,३x६), योगेश डोंगरे नाबाद २८, अनिकेत पोरवाल १०, श्रीकांत मुंढे १६, सत्यजीत बच्छाव ३-३१, अझीम काझी १-१७, दिव्यांग हिंगणेकर १-२२, प्रदीप दाढे १-१३) वि.वि.रत्नागिरी जेट्स: २०षटकात ७बाद १६७धावा(प्रीतम पाटील ३८(१६,४x४,३x६), निखिल नाईक नाबाद ३७(१७,४x६), अझीम काझी ३०(३०,१x४,१x६), दिव्यांग हिंगणेकर २४, योगेश चव्हाण १४, अभिषेक पवार ११, श्रेयस चव्हाण ४-१४, श्रीकांत मुंढे १-२५, मनोज यादव १-४२); सामनावीर - श्रेयस चव्हाण.