Dhananjay Mahadik vs Satej Patil : मध्यरात्रीचा हायव्होल्टेज ड्रामा, आक्षेपांमध्ये अडकलेली मत आणि महाविकास आघाडीची वाढलेली धाकधूक हे सर्व पाहिल्यानंतर अखेर राज्यसभेच्या 6 जागांचा फायनल निकाल आला. महाविकास आघाडीच्या 3 तर भाजपच्या 3 उमेदवारांचा विजय झाला आहे. शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी यांचा दणदणीत विजय झाला. तर भाजपच्या अनिल बोंडे आणि पियुष गोयल यांनीही विजयाचा गुलाल उधळला.  राज्यसभेची सहावी जागा चुरशीची होती.  या जागेवर भाजपचे धनजंय महाडिक आणि शिवसेनेचे संजय पवार उमेदवार होते. धनंजय महाडिकांनी हा विजय खेचून आणला. फडणवीसांची खेळी यशस्वी ठरली. महाविकास आघाडीचे 10 अपक्ष फोडण्यात फडणवीसांना यश आलं असल्याचं स्पष्ट झालं आहे. 

कोल्हापूरच्या रॉयल कुस्तीत भाजपच्या महाडिकांचा विजय

कोल्हापूरच्या रॉयल कुस्तीत भाजपच्या महाडिकांचा विजय झाला आहे.  धनंजय महाडिकांना तब्बल 8 वर्षांनी विजयाचा गुलाल लागला आहे. धनंजय महाडिक यांनी राज्यसभेच्या खासदारकीची खुर्ची पटकावली. आणि धनंजय यांचा मावळलेला सूर्य पुन्हा उगवतीला आला. गेल्या तीन वर्षातले सातत्याचे पराभव महाडिक यांच्या जिव्हारी लागले.  2019 साली गोकुळ गेलं.  2019 साली लोकसभेत पराभव झाला.  2019 साली विधानसभेत पराभव झाला आणि खरं तर महादेवराव महाडिकांच्या तालमीत वाढलेल्या या पठ्ठ्याचा सूर्य अस्ताला चालला होता.

सतेज पाटलांच्या वर्चस्वाला धक्का

दुसरीकडे सतेज पाटलांचं वर्चस्व वाढत चाललं होतं. सतेज पाटलांना चार वेळा आमदारकी मिळाली. दोन वेळा राज्यमंत्रिपद मिळालं. कोल्हापूरचं पालकमंत्रीपद मिळालं. गोकुळवर सत्ता मिळाली. जिल्हा परिषदेवर सत्ता मिळाली. महापालिकेवर सत्ता मिळाली . जिल्हा बँकेवर सत्ता मिळाली.  सतेज पाटलांचा वारु चौखूर उधळत होता. त्यातच कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक लागली. तिथेही सतेज पाटलांच्या नेतृत्त्वात काँग्रेसनं बाजी मारली आणि आता सतेज पाटलांचा डोळा होता तो महाडिक कुटुंबाला  राजकारणातून हद्दपार करण्याचा.  

कोल्हापूर जिल्ह्यात वर्चस्वाची लढाई आता आणखी घनघोर होणार

अशा वेळी राज्यसभेची निवडणूक दृष्टीपथात आली. पराभवाची मालिका सुरु असतानाही, भाजपने महाडिक कुटुंबावर विश्वास टाकला. धनंजय महाडिक यांना उमेदवारी जाहीर केली. खरं तर धोक्यातली जागा महाडिक यांनी पत्करली होती. पण त्यांच्या या धाडसानेच त्यांना आज विजयी बनवलंय. धनंजय महाडिक यांच्या विजयाने कोल्हापूरमधून हद्दपार झालेले कमळ पुन्हा एकदा फुललंय.  त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात वर्चस्वाची लढाई आता आणखी घनघोर होणार आहे. 

महाडिक यांच्या विजयाने भाजपला कोल्हापुरात संजीवनी

सतेज पाटील विरोधकांची मोट बांधण्याचे प्रयत्न मुन्ना महाडिक यांच्याकडून होणार आहे. आगामी मनपा, जिल्हा परिषद, आणि पंचायत समिती निवडणुकीत  महाडिक विरुद्ध पाटील सामना रंगणार आहे.  गोकुळनंतर राजाराम साखर  कारखाना हाती घेण्याच्या बंटी यांच्या मनसुब्याला सुरुंग लावण्याचा प्रयत्न देखील होईल.  भाजपमुक्त झालेल्या कोल्हापूर जिल्ह्यात महाडिक यांच्या विजयाने भाजपला संजीवनी मिळाली आहे. धनंजय महाडिक यांच्या  रूपाने भाजपला जिल्ह्यात  पहिला खासदार मिळाला आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

Rajya Sabha Election 2022 : संजय राऊत, प्रफुल्ल पटेल यांची बाजी, महाविकास आघाडी आणि भाजपचे तीन खासदार विजयी.. अटीतटीच्या लढतीत धनंजय महाडिक यांचा विजय

Dhananjay Mahadik : बाबांना विजयी गुलाल लागताच लेकाचे डोळे पाणावले ! विधानसभेच्या पायऱ्यांवर महाडिक बाप लेकाची गळाभेट

Rajya Sabha Election : सहाव्या जागेवर धनं'जय'..., भाजपची खेळी यशस्वी; धनंजय महाडिकांचा विजय, संजय पवार पराभूत