मुंबई : निशिकांत कामत.. मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतलं मोठं नाव. आपल्या कष्टाने आणि मेहनतीने निशिकांत कामत हा दिग्दर्शक मोठा बनला. रुईया कॉलेजच्या एकांकिकांपासून सुरूवात करून त्यांनी एकेक शिखरं काबीज केली. निशिकांत कामत तरुणाईत लोकप्रिय होते ते त्यामुळे. पण गेल्या काही काळापासून निशिकांत कामत आजाराशी झुंजत होते. पण काही महिन्यांपूर्वी ही झुंज अपयशी ठरली आणि कामत यांचं निधन झालं.


कामत यांनी अनेक नव्या मुलांना तयार केलं. रुईया नाक्यावर निशिकांत कामत कायम असायचे. त्यामुळे त्यांचा तरुणाईशी मोठा स्नेह, संबंध होता. त्यांनी आपल्या सिनेमातूनही अनेकांना वाव दिला. डोंबिवली फास्ट, मुंबई मेरी जान, दृश्यम, फोर्स आदी अनेक सिनेमांतून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. त्यांच्या कामाची दखल सिनेसृष्टी घेत होतीच. पण अनेक मराठी कलाकारांनी निशिकांत कामत यांना मनोमन आपलं गुरु मानलं होतं. हे नातं एकलव्य द्रोणाचार्यांसारखं होतं. पण या द्रोणाचार्याने आपल्या एकलव्यांना सतत दिलं. म्हणून निशिकांत कामत यांच्या निधनानंतरही त्यांच्या स्मृतींना वंदन केलं जातं.




चतुरस्र अभिनेता, गीतकार जीतेंद्र जोशीच्या पोस्टमुळे निशिकांत कामत पुन्हा एकदा सर्वांना आठवले. जीतेंद्र जोशी पहिल्यांदाच चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. त्याच्या चित्रपटाचं नाव आहे गोदावरी. काही दिवसांपासून सिनेमाचं चित्रिकरण सुरु झालं आहे. त्याची सुरूवात करताना जसे सर्वच दिग्दर्शक, निर्माते देवाचं स्मरण, पूजन करतात. तसं यावेळीही झालं. पण याच पूजनात जीतेंद्रने निशिकांत कामत यांचाही फोटो ठेवून आपल्या या गुरुला मनोमन वंदन केलं आणि आशीर्वाद घेतले. त्याने हा फोटो फेसबुकवर टाकल्यानंतर अनेकांनी जीतेंद्रला शुभेच्छा तर दिल्या आहेतच पण त्याच्या या कृतीचं कौतुकही केलं आहे.


अस्सल कलावंत कायम स्मरणात राहतो. पण जीतेंद्रसारखा मनस्वी कलावंत अशा प्रतिभावंत कलाकारांना कायम सोबत ठेवतो.