Jiah Khan Birthday : बॉलिवूड अभिनेत्री जिया खानचा (Jiah Khan) जन्म 20 फेब्रुवारी 1988 रोजी न्यूयॉर्कमध्ये अली रिझवी खान आणि राबिया अमीन यांच्या घरी झाला होता. तिचे खरे नाव नफिसा रिझवी खान होते. जिया खान अवघ्या दोन वर्षांची असताना तिचे वडील घर सोडून गेले. जिया जेव्हा 16 वर्षांची होती, तेव्हा ती 'तुमसा नहीं देखा' या चित्रपटाद्वारे तिच्या बॉलिवूड करिअरची सुरुवात करणार होती. परंतु, काही कारणांमुळे ते शक्य होऊ शकले नाही. यानंतर तिने तिच्या बॉलिवूड करिअरची सुरुवात 'निशब्द' या वादग्रस्त चित्रपटातून केली, ज्यामध्ये तिच्यासोबत अमिताभ बच्चन देखील होते.


जिया खानची आई राबिया अमीन देखील अभिनेत्री होती. तसेच, जिया खानच्या काकू संगीता (परवीन रिझवी) आणि कविता (नसरीन रिझवी) या पाकिस्तानी अभिनेत्री होत्या. जिया खानने वयाच्या 6व्या वर्षी 'रंगीला' चित्रपट पाहिला आणि हा चित्रपट पाहिल्यानंतर तिच्यात अभिनयाची आवड निर्माण झाली.



जिया खानला शाहिद कपूर खूप आवडायचा. मात्र, याच कारणामुळे केन घोषचा चित्रपटही तिच्या हातातून गेला होता. जिया खानने शाहिद कपूरसोबत ‘चान्स पे डान्स’चे शूटिंग जवळपास पूर्ण केले होते. पण, नंतर केन घोषने तिला चित्रपटातून काढून तिच्या जागी जेनेलिया डिसूजाला घेतले होते. त्यावरून अनेक दिवस वादही सुरू होता.


जिया खान बॉलिवूडमधील काही यशस्वी चित्रपटांचा एक भाग होती. परंतु, तिच्या अकाली मृत्यूने सर्वांनाच धक्का बसला आणि तिच्या आत्महत्येनंतर अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या. 3 जून 2012 रोजी वयाच्या अवघ्या 25व्या वर्षी तिने मुंबईतील राहत्या घरी आत्महत्या केली. यानंतर तिच्या आईने अभिनेता सूरज पांचोलीवर जिया खानला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला होता. त्यावेळी सूरज पांचोली जिया खानचा बॉयफ्रेंड होता.


जिया खानला मृत्यूपूर्वी अनेक वेदना झाल्या होत्या. आत्महत्येपूर्वी जिया खानने सहा पानी पत्र लिहिले होते, ज्यात तिने सूरज पांचोलीवर गर्भपात आणि मारहाणीचा आरोप केला होता. या प्रकरणात सूरज पांचोलीही काही काळ तुरुंगात होता. मात्र, सूरज पांचोलीने जिया खानच्या आत्महत्येसाठी कधीही स्वत:ला जबाबदार धरले नाही. तो म्हणाला होता की, जिया खानवर लहान वयातच कामाचा खूप ताण होता आणि त्यामुळे ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाली होती. या ताणातून तिने हे पाऊल उचलले, असे त्याने म्हटले होते.


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha