Border 2 Javed Akhtar: 28 वर्षानंतर बॉर्डरचा सिक्वेल प्रेक्षकांसमोर येत आहे. 1997 मध्ये प्रदर्शित झालेला बॉर्डर या चित्रपटांना बॉलीवूडच्या वॉर फिल्मचा चेहरा मोहरा बदलून टाकला. आजही हा चित्रपट प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. बॉर्डर सिनेमातील 'संदेसे आते है' सारख्या अजरामर गाण्यांनी या चित्रपटाला वेगळीच उंची दिली होती.  आता तब्बल 28 वर्षानंतर बॉर्डर 2 मोठ्या पडद्यावर येत असताना या चित्रपटातील गाण्यांविषयी प्रेक्षकांना मोठी उत्सुकता आहे. पण या सिक्वलमध्ये प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांचे एकही गाणे नसल्याने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या. बॉर्डर चित्रपटातील गाण्यांचे लेखक असणारे जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी बॉर्डरच्या सिक्वेलमधील गाणी लिहिण्यास स्पष्ट नकार दिलाय. नकार देण्यामागचं कारणही त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं आहे. 

Continues below advertisement

'खरंतर हे सर्जनशील दिवाळं '

बॉर्डर 2 चित्रपटासाठी पुन्हा गाणी लिहाल का असं या चित्रपटाच्या मेकर्सने जावेद अख्तरांना विचारलं होतं. मात्र त्यांना स्पष्ट नकार देत आधीच हित असलेलं गाणं थोडासा बदल करून पुन्हा देणं म्हणजे सर्जनशील दिवाळं आहे असं म्हणत तिखट नकार दिला. एका वृत्त माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

मुलाखतीत जावेद अख्तर म्हणाले की, ‘बॉर्डर 2’साठी गाणी लिहिण्याची ऑफर त्यांना देण्यात आली होती. मात्र त्यांनी ती स्वीकारली नाही. “मेकर्सनी मला लिहायला सांगितलं होतं, पण मी नकार दिला. मला खरंच वाटतं की हे बौद्धिक आणि सर्जनशील दिवाळपण आहे. एखादं जुनं गाणं यशस्वी ठरलं म्हणून त्यात थोडंसं बदल करून ते पुन्हा सादर करणं योग्य नाही. नवीन गाणी तयार करा, अन्यथा मान्य करा की आता तुम्ही तोच दर्जा गाठू शकत नाही,” असं ते म्हणाले.

Continues below advertisement

भूतकाळावर अवलंबून राहण्याची गरज नाही

जुन्या गाण्यांच्या रिमेकवरही जावेद अख्तर यांनी परखड मत मांडलं. “जे झालं, ते होऊन गेलं. त्याला पुन्हा निर्माण करण्याची गरज काय? आमच्यासमोर ‘हकीकत’सारखा चित्रपट होता. त्यातील ‘कर चले हम फिदा’ आणि ‘मैं ये सोचकर उसके दर से उठा था’ ही गाणी अफलातून होती. तरीही आम्ही ती वापरली नाहीत. पूर्णपणे नवीन गाणी लिहिली आणि ती लोकांना आवडलीसुद्धा,” असं त्यांनी सांगितलं. मार्केटिंगसाठी जुनी आठवण ताजी करण्याच्या प्रवृत्तीवरही त्यांनी टोला लगावला. “तुम्ही पुन्हा चित्रपट बनवत असाल, तर नवीन गाणी तयार करा. भूतकाळावर अवलंबून राहण्याची गरज नाही. जुन्या वैभवावरच जगायचं, असा संदेश यातून जातो,” असं जावेद अख्तर म्हणाले.

दरम्यान,‘बॉर्डर 2’मधील ‘घर कब आओगे’ हे गाणं नव्या रूपात सादर करण्यात आलं आहे. या गाण्याला अरिजीत सिंग, विशाल मिश्रा, दिलजीत दोसांज आणि सोनू निगम यांनी आवाज दिला आहे. मूळ गाणं जावेद अख्तर यांनी लिहिलं होतं आणि संगीत अनु मलिक यांचं होतं. अनुराग सिंग दिग्दर्शित ‘बॉर्डर 2’मध्ये सनी देओल, वरुण धवन, अहान शेट्टी आणि दिलजीत दोसांज प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. गुलशन कुमार आणि टी-सीरिज प्रस्तुत हा चित्रपट 23 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.