Akshay Kumar Safe After Serious Road Accident Near Juhu: सिनेसृष्टीतून खळबळ उडवणारी बातमी समोर येत आहे. शूटिंगवरून परतत असताना अभिनेता अक्षय कुमारच्या वाहनाचा भीषण अपघात झाला. विमानतळावरून जुहू येथील घरी जात असताना आलिशान मर्सिडीजने रिक्षाला धडक दिली. यात अक्षय कुमारच्या सुरक्षेसाठी असलेल्या वाहनाचेही नुकसान झाले. या भीषण अपघातात रिक्षाचा चुराडा झाला. तर, चालकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. या भीषण अपघातानंतर प्रत्यक्षदर्शींनी धाव घेत ऑटो चालकाला तातडीने रूग्णालयात नेले. तसेच जुहू पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरूवात केली. दरम्यान, या अपघाताच्या घटनेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. जुहू पोलिसांनी मर्सिडीज कार चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्याला ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशीला सुरूवात केली आहे.
अपघात नेमका कसा घडला?
या भीषण अपघाताची घटना जुहू येथील थिंक जिमजवळ 20 जानेवारी रोजी मध्यरात्री घडली. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अक्षय कुमार शूटिंगवरून जुहू येथील घरी जाण्यासाठी परतत होता. अक्षय कुमार उपस्थित असलेल्या कारच्या मागे सुरक्षेसाठी एस्कॉर्ट SUV जात होती. SUVच्या मागे बासित खान नावाचा तरूण ऑटो रिक्षा चालवत होता. दरम्यान, ऑटो रिक्षाच्या मागून एक भरधाव मर्सिडिज येत होती. भरधाव मर्सिडिजने ऑटो रिक्षाला जोरदार धडक दिली. ऑटो रिक्षाचा पुढचा भाग थेट SUVच्या मागच्या साईडला जाऊन धडकली. या भीषण अपघातात रिक्षाचा अक्षरश: चुराडा झाला. तर, SUVचा मागचा भाग उचलला गेला.
या भीषण अपघातात रिक्षा चालक गंभीर जखमी झाला. प्रत्यक्षदर्शींनी तातडीने घटनास्थळी धाव घेत रिक्षा चालकाला बाहेर काढले. अपघात घडल्यानंतर अक्षय कुमार देखील आपल्या वाहनातून बाहेर आला. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव त्याच्या टीमने त्याला सुरक्षितस्थळी नेले. अपघाताची माहिती मिळताच जुहू पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच तपास सुरू केला. मिळालेल्या माहितीनुसार, श्री श्री रविशंकर महाराज यांच्या वाहनामुळे अपघात घडला असल्याची माहिती आहे.
गांधीग्राम रोडवरील रहेजा या इमारतीमध्ये श्री श्री रवीशंकर महाराज काल रात्री साडेनऊ दहाच्या सुमारास आले होते. यावेळी त्यांचे वाहन आत जात असताना रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक कोंडीतून मार्ग काढत असताना श्री श्री रवीशंकर महाराज यांच्या मर्सिडिजने रिक्षाला जबर धडक दिली. यानंतर अक्षय कुमार याच्या एस्कॉर्ट कार आणि रिक्षाचा अपघात झाला. अक्षय कुमार सहकुटुंब कारमधून जात असल्याची माहिती आहे. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. याप्रकरणी जुहू पोलिसांनी मर्सिडिस कार चालक राधेश्याम रायविरोधात गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे.
