मुंबई : कलर्स वाहिनीवर सुरु असलेल्या बिग बॉस रिअॅलिटी शोमध्ये प्रसिद्ध गायक कुमार सानूचा मुलगा जानकुमार सानूनं मराठी भाषेबद्दल मानहानीकारक वक्तव्य केल्यानं संताप व्यक्त केला जात आहे. मराठी भाषेची याला चीड येते, अशा संदर्भातलं वक्तव्य जान कुमार सानूनं केलं आहे. यावर मनसेनं त्याला चांगलाच इशारा दिला आहे.


मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, जान कुमार सानू... मराठी भाषेची याला चीड येते म्हणे. अरे तू कीड आहेस मोठी... मुंबईतून हाकलून देण्यासाठी याला मी नॉमिनेट करतोय, असं अमेय खोपकर यांनी म्हटलं आहे.





ट्विटमध्ये अमेय खोपकर म्हणतात की, मुंबईत राहून तर आता तुझं करिअर कसं बनतं जान सानू तेच बघतो आता मी. लवकरच तुला स्वत:ची चीड येईल ही माझी गॅरंटी. तुला थोबडवनार लवकरच आता आम्ही मराठी. कलर्ससारख्या वाहिनीने खरंतर हा सीन वगळायला हवा होता, पण एडिट केलं नाही ते बरं झालं, गद्दारांची तोंडं कशी असतात ते समजलं, असं देखील खोपकर यांनी म्हटलं आहे.





बिग बॉसची शूटिंग बंद पाडू - अमेय खोपकर


कलर्स चॅनेल आणि जान सानूने 24 तासाच्या आत जर शो मध्ये माफी मागितली नाही तर बिग बॉसची शूटिंग बंद पाडू असा इशारा अमेय खोपकर यांनी दिला आहे.  जान सानूचं थोबाड फोडून आम्ही त्याला धडा निश्चित शिकवू आणि याला भविष्यात इंडस्ट्रीत काम कसं मिळतं हे ही पाहू, असंही खोपकर एबीपी माझाशी बोलताना म्हणाले.


जान सानूवर नेपोटिझमचा आरोप
बिग बॉस 14 मध्ये सतत काही ना काही गोंधळ सुरु असतो. बॉलिवूडमधील नेपोटिझमचा मुद्दा बिग बॉसच्या घरात देखील जाऊन पोहोचला आहे. महाराष्ट्रीयन गायक राहुल वैद्यने एलिमिनेशनमध्ये जान कुमार सानू नॉमिनेट करताना नेपोटिझमचा आरोप केला होता. जान कुमार सानूवर नेपोटिझमचा आरोप केल्यानंतर त्याच्या आईने आरोप फेटाळले आहेत. त्यांनी म्हटलं आहे की, जानमध्ये प्रतिभा आहे.  घरातील लोक तसेच पब्लिक देखील जानला त्याच्या टॅलेंटमुळं प्रेम करत आहेत, असं जानच्या आईनं म्हटलं आहे.