Irrfan Khan Birth Anniversary आपल्या वाट्याला आलेल्या प्रत्येक भूमिकेला पूर्णपणे न्याय देणारा आणि ती भूमिका अक्षरश: जगणाऱ्या अभिनेता इरफान खान (Irrfan Khan) यांनी 2020 या वर्षी जगाचा निरोप घेतला. इरफान यांच्या जाण्यानं कलाविश्वात कधीही न भरुन निघणारी पोकळी निर्माण झाली. असं असलं तरीही या कलाकाराच्या जाण्याचं दु:ख न करता त्यांच्याच कलाकृतींच्या माध्यमातून त्यांच्या जीवनप्रवासाचा आनंदोत्सव साजरा करण्याकडे अनेकांचाच कल दिसून आला.


इरफान यांच्या Birth Anniversaryच्या निमित्तान संपूर्ण कलाविश्वातून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जात असतानाच अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) हिनंही एक भावनिक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. अनुष्कानं इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये इरफान यांचं एक कृष्णधवल छायाचित्र शेअर केलं. सोबतच तिनं भावनिक कॅप्शन लिहित तुमचा वारसा कायमस्वरुपी जगत राहील अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या.


कर्करोगाशी प्रदीर्घ काळासाठी झुंज दिल्यानंतर अभिनेता इरफान खान यांनी या जगाचा निरोप घेतला. वयाच्या 53 व्या वर्षीच आयुष्याच्या या रंगमंचावरुन एक्झिट घेणाऱ्या या अष्टपैलू अभिनेत्यानं होऊ घातलेल्या नवोदित कलाकारांसाठी कलेचा कधीही न संपणारा साधा आणि वारसा मागे ठेवला आहे. त्यामुळं इरफान आज आपल्यात नसले तरीही त्यांचं अस्तित्वं मात्र विविध रुपांनी आपल्यात आहे ही बाब नाकारता येत नाही.


एक अभिनेता कसा असावा, या प्रश्नाचं परिपूर्ण उत्तर म्हणजे इरफान खान. आपल्या वाट्याला आलेलं पात्र, संवादकौशल्य, रुपेरी पडद्यावरील त्यांचा वावर, अद्वितीय अभिनय कौशल्य, भूमिकांची निवड आणि काळजाला भिडणारी नजर आणि तितकाच प्रभावी आवाज या घटकांवर इरफान यांची विशेष पकड. फक्त भारतीय नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही इरफान खान यांनी त्यांच्या कलेचा ठसा उमटवला आहे.


अर्थपूर्ण आयुष्य जगण्यासाठी सेलिब्रिटी फॅशन डिझायनर स्वप्नीलची झाली 'साईशा'


साहबजादे इरफान....


7 जानेवारी 1966 मध्ये इरफान यांचा जन्म जयपूरमध्ये झाला होता. साहबजादे इरफान अली खान, असं त्यांचं मूळ नाव. चित्रपट विश्वात अबाधित स्थान निर्माण करणाऱ्या या अभिनेत्यानं 2020 मधील एप्रिल महिन्यात जगाचा निरोप घेतला. नावाप्रमाणंच हा अभिनेता खऱ्या अर्थानं रुपेरी पडद्यावरी 'साहबजादां' ठरला.