मुंबई : आपली ओळख नेमकी काय, हे गवसण्यासाठी तिला वेळ लागला. पण, ज्यावेळी याची अनुभूती झाली तेव्हा मात्र तिनं जीवनालाच कलाटणी देणारा एक निर्णय घेतला. समाजाच्या दृष्टीनं हा निर्णय तितकाच धाडसी ठरला, तर कलावविश्व आणि इतर अनेकांसाठी तो स्वागतार्हही ठरला. हा निर्णय़ होता transwoman होण्याचा आणि तो घेतला आहे बॉलिवूडमधील सेलिब्रिटी फॅशन डिझायनर स्वप्नील शिंदे ज्यांची नवी ओळख असणार आहे 'साईशा'.
दीपिका पदुकोण, किआरा अडवाणी, श्रद्धा कपूर, कतरिना कैफ यांच्यासह इतरही अनेक सेलिब्रिटींसोबत काम करणअयाचा अनुभव असणारा स्वप्नील शिंदे यापुढं ट्रान्सवुमन असतील. सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून जीवनातील या महत्त्वाच्या बदलाची माहिती आताच्या साईशानं सर्वांसमोर आणली. सोबतच आपल्या नावाचा अतिशय समर्पक अर्थही सर्वांपुढं मांडला. साईशा, म्हणजेच अर्थपूर्ण आयुष्य....
सोशल मीडिया पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं....
'तुमच्या बालपणीच्या काही आठवणी जागवणाऱ्या अशा अनेक गोष्टी असतात. माझ्यासाठी हे सारं म्हणजे एकाकीपणा, एक प्रकारचं दडपण आणि मनातील कोलाहलानं प्रत्येक क्षणाला होणारा माझा गोंधळ इतकंच', असं या पोस्टच्या सुरुवातीलाच लिहिलं गेलं. ज्यावेळी शाळा आणि महाविद्यालातील मुलं आपल्याला वेगळं म्हणून हिणवायचे तेव्हा होणाऱ्या यातना या शब्दांपलीकडच्या असल्याचं इथं न चुकता नमूद करण्यात आलं. हे जगणं आपलं स्वत:चं नसल्याचं माहिती असतानाही आपण या समाजाच्या अपेक्षा आणि अटींपोटी जगत होतो. पण, ऐन तारुण्यावस्थेतच मी हे सत्य स्वीकारलं आणि खऱ्या अर्थानं आयुष्य बहरलं, असं या पोस्टमध्ये म्हटलं गेलं आहे.
बरं, स्वप्नील यांचा साईशा होण्यापर्यंतचा प्रवास इथंच थाबंला नव्हता. जीवनातील काही वर्षे आपण गे असल्याचं समजत तो पुरुषांकडे आकर्षित झाला. पण, सहा वर्षांपूर्वीच त्यानं ही बाब स्वीकारली की, आपण गे पुरुष नसून एक ट्रान्सवुमन आहोत.
हा बदल इतका सकारात्मक पद्धतीनं स्वीकारला गेला की, शिंदे यांना आता त्यांचा स्टाफही 'मॅम' म्हणून संबोधत आहे, तेही अतिशय अभिमानानं. त्यांनी आपल्या जीवनातील या अतिशय मोठ्या बदलाची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांसमक्ष आणली तेव्हा सेलिब्रिटींपासून ते कला विश्वातील अनेक मित्रमंडळींकडून त्यांच्यावर या नव्या वाटचालीसाठी शुभेच्छांचा आणि या निर्णयासाठी कौतुकाचा वर्षाव करण्यात आला. अदिती राव हैदरी, सई ताम्हणकर, परिणीती चोप्रा, सनी लिओनी यांनी साईशा शिंदेचं या वर्तुळात मोठ्या आपलेपणानं स्वागत केल्याचं पाहायला मिळालं.