वॉशिंग्टन : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुका 2020 च्या निकालांवर सध्या अमेरिकेत सत्तासंघर्ष सुरु आहे. अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी अमेरिकेच्या संसदेत घुसून धुडगूस घातला आहे. अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रकार घडला आहे. संसदेत घुसलेल्या समर्थक आणि पोलिसांमध्ये मोठी धुमश्चक्री देखील झाली. यावेळी आंदोलकांना आवरण्यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एका आंदोलकाचा मृत्यू झाला आहे.


जगातील महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेत घडलेल्या या घटनेबाबत संपूर्ण जगभरातून खेद व्यक्त करण्यात येत आहे. वॉशिग्टन डीसीमध्ये झालेल्या या हिंसेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "बेकायदेशीर विरोधी आंदोलनांमार्फत लोकशाहीचा विध्वंस करु दिला जाऊ शकत नाही."


पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्वीट :


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर लिहिलं आहे की, "वॉशिंग्टन डीसीमध्ये झालेल्या हिंसेचं वृत्त पाहून खूपचं अस्वस्थ झालो. शक्तीचं क्रमाने आणि शांततेत हस्तांतरण चालूच ठेवले पाहिजे. बेकायदेशीर विरोधी आंदोलनांमार्फत लोकशाहीचा विध्वंस करु दिला जाऊ शकत नाही."





डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव स्विकारण्यास नकार


अमेरिकेचे मावळते राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प निवडणुकीतील आपला पराभव स्विकारण्यास तयार नाहीत. त्यामुळे अमेरिकेच्या संसदेत बुधवारी ट्रम्प समर्थकांनी धुडगूस घातला. संसदेत घुसलेल्या समर्थक आणि पोलिसांमध्ये मोठी धुमश्चक्री देखील झाली. यावेळी आंदोलकांना आवरण्यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एका आंदोलकाचा मृत्यू झाला आहे.


हिंसेत महिलेचा मृत्यू, अनेक जखमी


कॅपिटल बिल्डिंगबाहेर ट्रम्प समर्थकांची पोलिसांसोबत झटापटही झाली. या हिंसाचारात एका नागरिकाचा गोळी लागून मृत्यू झाला असून काही जण जखमी झाल्याचं समजतं. वॉशिंग्टन डीसी पोलीस प्रमुखांनी या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे. यूएस कॅपिटलमध्ये एका महिलेचा गोळी लागून मृत्यू झाला तर हिंसाचारात अनेक अधिकारी जखमी झाले आहेत.


ट्रम्प यांचं समर्थकांना शांततेचं आवाहन


दरम्यान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या समर्थकांना शांत राहण्याचं आवाहन केलं आहे. शांततेत आंदोलन करण्याचा आवाहन करताना ट्रम्प म्हणाले की, आंदोलनात हिंसाचार होऊ नये. लक्षात ठेवा आपण कायदा-सुव्यवस्थेचा पक्ष आहोत.


पाहा व्हिडीओ : अमेरिकन संसदेत अभूतपूर्व घटना;राजकीय विश्लेषक कौमुदी वाळिंबे यांच्याशी चर्चा



फेसबुकने ट्रम्प यांचा व्हिडीओ हटवला


ट्विटरपाठोपाठ फेसबुकनेही अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा व्हिडीओ हटवला आहे. यूएस कॅपिटलमध्ये हिंसेदरम्यान ट्रम्प यांनी समर्थकांना संबोधित केलं होतं. फेसबुकचे अधिकारी गाय रोसेन म्हणाले की, आम्ही ट्रम्प यांचा व्हिडीओ हटवला आहे. कारण त्यांचा व्हिडीओमुळे यूएस कॅपिटलमधील हिंसेंला प्रोत्साहन देते असं आमचं मत आहे.


अमेरिकेत नेमकं काय घडलं?


अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी घेण्यात आलेल्या निवडणूक निकालांबाबत तेथील संसदेची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत इलेक्टोरल कॉलेजबाबत चर्चा सुरु होती. बैठकीत जो बायडन यांच्या विजयाची घोषणाही केली जाणार होती. पण, त्याचवेळी ट्रम्प समर्थक कॅपिटल बिल्डिंगमध्ये घुसले, ज्यामुळं संसदेचं कामकाज थांबवावं लागलं. ट्रम्प समर्थकांनी कॅपिटल बिल्डिंगबाहेर एकच गोंधळ घातला. क्षणार्धातच या आंदोलनाला हिंसक स्वरुप प्राप्त झालं.


महत्त्वाच्या बातम्या :