मुंबई : सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ईडीकडे नवीन कागदपत्रे समोर आली आहेत. यावरुन कळतं की रियाला गोकुलम फिल्म्सकडून काही पैसे आले होते आणि गोकुलममध्ये सुशांतने पैसे पाठवले होते. दुसऱ्यांदा रियाच्या झालेल्या चौकशीचा ईडी बारकाईने अभ्यास करत आहे तसेच सुशांतच्या मोबाईलद्वारे काही माहिती मिळते का याचाही प्रयत्न ईडीच्या अधिकाऱ्यांकडून केला जात आहे. यासाठी ते मुंबई पोलिसांच्या संपर्कात आहेत.


सुशांत प्रकरणामध्ये मुख्य आरोपी असलेली रिया चक्रवर्तीची पुन्हा चौकशी करण्याआधी ईडी काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. याच प्रकरणात सुशांतच्या बँक खात्यासंदर्भात ईडीला नवीन माहिती मिळाली आहे. गोकुलम फिल्म्स नावाच्या कंपनीने रियाला मार्च 2019 मध्ये 72 हजार रुपयांद्वारे पाठवले होते. सुशांतने गोकुलम फिल्म्सला नोव्हेंबर 2019 मध्ये तीन लाख रुपये दिले होते.


ईडी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार "सुशांतने केरळ ते तमिळनाडूमध्ये एक इव्हेंट केला होता आणि इव्हेंटमध्ये अडीच कोटी रुपये खर्च झाले होते. रियाच्या अकाऊंटमधून 72 हजार रुपये ही छोटी रक्कम मिळाली असली तरीही आम्ही याचा तपशील घेणार आहोत." गोकुलम फिल्म्सने ही रक्कम रियाच्या अकाऊंटमध्ये का पाठवली आणि सुशांतने गोकुलम फिल्म्सला हे पैसे का दिले? या आर्थिक व्यवहारावर ईडीला संशय आहे आणि म्हणूनच ईडी गोकुलम फिल्म्सची पण चौकशी करु शकते.


तसेच गोकुलम फिल्म्सने रियाच्या अकाऊंटमध्ये अजून किती पैसे पाठवले किंवा रियाच्या म्हणण्यावर अजून कोणाच्यातरी अकाऊंटमध्ये पैसे पाठवण्यात आले का याचाही तपास ईडी करणार असून याला ईडीच्या संशयास्पद व्यवहाराच्या श्रेणीत ठेवलं जातं. कारण ज्या व्यक्तीचा संशयास्पद परिस्थितीमध्ये मृत्यू झाला असेल आणि जर त्याच्या खात्यातून पैसे जात असतील आणि जो व्यक्ती या प्रकरणात आरोपी आहे त्याच्या खात्यात पैसे येत असतील अशा व्यवहाराला संशयास्पद व्यवहार म्हटलं जातं. तसेच रियावर काही कर्ज तर नव्हते ना आणि सुशांत तिचे कर्ज तर फेडत नव्हता ना याचा तपास सुद्धा ईडीकडून करण्यात येणार असल्याची शक्यता आहे.


ईडी सुशांतच्या मोबाईलद्वारे शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे. जेणेकरुन आर्थिक व्यवहार संदर्भातील काही माहिती मिळण्यास किंवा आर्थिक व्यवहारासंदर्भात सुशांत कुणाशी काही बोलत होता का याचीही माहिती मिळण्यास मदत होईल.


सुशांतच्या मृत्यूनंतर त्याचा मोबाइल मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतला आहे आणि आता ईडी या मोबाईलसाठी मुंबई पोलिसांच्या संपर्कात असल्याचं कळत आहे. ईडीच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या मोबाईलमुळे काही महत्त्वाच्या गोष्टी समोर येऊ शकतात. तर ईडीने सुशांतचं बँक अकाऊंट बारकाईने पाहिलं असता त्यांना 13 ते 21 नोव्हेंबर दरम्यान झालेल्या खर्चाने त्यांची झोप उडवली. ईडीने सुशांतचे मित्र आणि त्याच्या घरी काम करणाऱ्या नोकरांची सुद्धा चौकशी करणार आहे. सुशांतच्या घरी कोणकोण येत जात होतं आणि पैसे कुठे ट्रान्सफर झाले असतील याचा तपास ईडी करणार असल्याची माहिती मिळत आहे.


असे आहेत सुशांतच्या बँक खात्यातील खर्चाचे तपशील!


14 नोव्हेंबरला रियाला दीड लाख रुपये देण्यात आले तर रियाच्या मेकअपसाठी चाळीस हजार रुपये खर्च करण्यात आला.


सुशांतच्या या खर्चामध्ये दारु, चॉकलेट, जीएसटी, फर्निचर आणि इलेक्ट्रिकचा खर्चचा सुद्धा समावेश आहे.


सुशांतच्या खात्यामधून कळलं आहे की, एका आठवड्याच्या आत सुशांतने 28 लाख रुपये खर्च केले म्हणजेच 4 लाख रुपये रोज. या एका आठवड्याच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात अकाऊंटमधून पैसे काढले गेले. याच दरम्यान एकाच दिवसात पाच लाख रुपये अकाऊंटमधून चेकद्वारे काढण्यात आले. दोन पेक्षा जास्त वेळा एटीएमद्वारे रक्कम काढण्यात आली. तसेच इतक्या मोठ्या प्रमाणात पैसे सुशांतने स्वत: त्याच्या अकाऊंटमधून काढले का याची सुद्धा उत्तरं ईडीला हवी आहेत.


सूत्रांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे स्टॅण्डर्ड चार्टर्ड बँक अकाऊंटमध्ये 25 ते 30 लाख रुपये जमा आहेत. एचडीएफसी बँक अकाऊंटमध्ये 1 कोटी 17 लाख रुपये जमा आहेत. तर कोटक बँक अकाऊंटमध्ये 2 कोटी 24 लाख रुपये जमा आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात सुशांतच्या अकाऊंटमधून पैसे काढण्यात आले. हे पैसे चेक आणि एटीएम द्वारा काढण्यात आलेत, हे पैसे काढण्यामागे नेमका सुशांत होता का? किंवा अजून कोणाचा यामध्ये सहभाग आहे का? या अनुषंगाने सुद्धा आता ईडी तपास करत आहे.


Sushant Singh Rajput | तपासासाठी ईडीला हवाय सुशांतचा मोबाईल, सध्या मोबाईल मुंबई पोलिसांकडे