Independence Day 2022 : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या प्रांगणात भारतीय स्वातंत्र्याचा 75वा वर्धापन दिन (Independence Day 2022) उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विवेक भीमनवार यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. या ध्वजारोहण समारंभास सह व्यवस्थापकीय संचालक कुमार खैरे उपस्थित होते.
यावेळी उपस्थित असलेल्या बँडपथकाने राष्ट्रभक्तीपर विविध गीतांची धून वाजवून वातावरण राष्ट्रभक्तीमय केले, तर बॉलिवूड पार्कच्या सहकार्यातून राष्ट्रभक्तीपर गीतनाट्य सादर करण्यात आले. दरम्यान चित्रनगरीच्या परिसरात असलेल्या दादासाहेब फाळके यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास व्यवस्थापकीय संचालक विवेक भीमनवार यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
ध्वजारोहण समारंभास उप अभियंता (विद्यूत) अनंत पाटील, अंतर्गत लेखा परीक्षक अधिकारी राजू राठोड, उप व्यवस्थापक (नियोजन व विकास) मुकेश भारद्वाज, जनसंपर्क अधिकारी मंगेश राऊळ, सहाय्यक व्यवस्थापक (कलागारे) मोहन शर्मा, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) प्रमोद लोखंडे, व्यवस्थापकीय संचालक यांच्या स्वीय सहाय्यक अनिता कांबळे, वरिष्ठ सहाय्यक विजय टिकम, लेखापाल अक्षता शिगवण, महामंडळाचे सुरक्षा अधिकारी अशोक जाधव, सुरक्षा अधिकारी सुनील पोखरकर, सहाय्यक सुरक्षा अधिकारी प्रसाद नाटकर, कर्तव्यावर तैनात असलेले सुरक्षा जवान तसेच महामंडळाच्या विविध विभागाचे कर्मचारी आणि आरे परिसरातील विद्यार्थी-पालक उपस्थित होते.
स्वातंत्र्यदिनाचा इतिहास
इ.स. 1770 पासून भारतावर इंग्रजांचे राज्य होते. 19व्या शतकापासूनच सर्व राज्यांना इंग्रजांनी आपल्या सैन्यबळावर ताब्यात ठेवले होते. 1857 च्या स्वातंत्र्य समरानंतर ब्रिटिशांनी त्यांची व्यवस्था अजूनच शिस्तीची केली. 1885 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली.
दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटिशांना लक्षात आले की, आपल्याला भारतावरचे राज्य आणि युद्ध हे सांभाळता येणार नाही आहे. तसेच, दुसऱ्या बाजूला भारतीय क्रांतिकारकांचा जोर वाढत होता. ही गोष्ट कळल्यानंतर ब्रिटनच्या पंतप्रधानांनी जून 1947 पर्यंत भारत पूर्णपणे स्वतंत्र करण्याची हमी दिली. अखेर दिनांक 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. पण, त्यावेळी भारताचे पाकिस्तान आणि भारत असे दोन तुकडेही पडले. पाकिस्तानी भागात राहणाऱ्या अनेक पंजाबी आणि सिंधींना त्यांचे घरदार, पैसा सोडून यावे लागले. अनेक लोक यामध्ये मारलेही गेले.
स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व
आपल्या स्वातंत्र्यासाठी आणि ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी बलिदान दिले आहे. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ठिकठिकाणी ध्वज फडकविला जातो तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी 15 ऑगस्ट 1947 रोजी दिल्लीतील लाल किल्ल्यातील लाहोरी गेटच्या वर भारतीय राष्ट्रध्वज उंचावला. तेव्हापासून ही परंपरा सुरु झाली आहे.
हेही वाचा :