मुंबई : ऑस्कर विजेता संगीतकार ए आर रहमानने संगीत दिलेला 'दिल बेचारा' चित्रपट काल डिस्ने हॉटस्टारला प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर एका मुलाखतीत बोलताना ए.आर. रहमानने म्हटलं की, एक गँग माझ्याविरोधात काम करत आहे, ते माझ्याविषयी अफवा पसरवत आहे आणि यामुळे बॉलिवूडमध्ये मला काम मिळत नाही.
मुलाखतीत ए.आर. रहमानने म्हटलं की, 'मी चांगल्या चित्रपटांना नाकारत नाही. मात्र मला असं वाटतं की, बॉलिवूडमध्ये एखादी गँग आहे जी माझ्याबद्दल चुकीच्या अफवा पसरवत आहे. मुकेश छाब्रा माझ्याकडे आला आणि मी दोन दिवसांत त्याला चार गाणी तयार करू दिली. त्यावेळी मुकेश छाब्रा मला म्हणाला की, इंडस्ट्रीमधल्या अनेकांनी मला ए. आर. रहमानकडे जाऊ नको असं सांगितलं होतं. छाब्राकडून मला अनेक गोष्टी समजल्या.
बॉलिवूडमध्ये मला कमी काम का मिळत आहे, हे मला मुकेश छाब्राला भेटल्यानंतर कळालं. चांगले चित्रपट मला का मिळत नाहीत याचा देखील मला अंदाज आला. मी डार्क सिनेमे करतो, कारण एक संपूर्ण गँग माझ्याविरोधात काम करत आहे. यातून माझं नुकसान होत आहे, असंही ए आर रहमानने म्हटलं.
पुढे ए आर रहमानने म्हटलं की, माझ्यासोबत काम करण्याची अनेकांची इच्छा आहे. पण अनेक लोक आहेत ज्यांची इच्छा माझ्यासोबत काम करण्याची नाही. पण ठीक आहे, मी नशिबावर विश्वास ठेवतो आणि माझा विश्वास आहे की सर्व काही ईश्वरद्वारे आपल्याकडे येते.
संबंधित बातम्या