Holi 2022 : भारतात होळीचा (Holi) सण खूप आनंदात जल्लोषात साजरा केला जातो. देशभरातील लोक हा सण मोठ्या थाटामाटात साजरा करतात. काही ठिकाणी तर चक्क आठवडाभर रंगांची उधळण केली जाते. होळी जगभरात वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. भारतात होळीचा सण साजरा करण्यासाठी जगभरातून लोक येतात. रंगांचा हा सण बॉलिवूडमध्येही मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.


ऑनस्क्रीन असो की ऑफस्क्रीन, कलाकारांची होळी या रंगांच्या सणाची मजा आणखीनच वाढवते. बॉलिवूडमध्ये ब्लॅक अँड व्हाईट जमान्यापासून होळीचा सण साजरा केला जातो.


मेहबूब खानशी होळीचं खास कनेक्शन!


होळी सण दाखवला गेलेला पहिला चित्रपट 82 वर्षांपूर्वी म्हणजेच स्वातंत्र्यापूर्वी प्रदर्शित झाला होता. 1940 मध्ये ‘औरत’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्यातच पहिल्यांदा होळीचा सण साजरा करताना दाखवण्यात आला होता. या चित्रपटात होळी साजरी झाली असली, तरी ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट असल्याने यात रंग पाहायला मिळाले नाहीत. ‘औरत’ चित्रपट मेहबूब खान यांनी दिग्दर्शित केला होता. या चित्रपटात सरदार अख्तर, सुरेंद्र, याकुब आणि कन्हैया लाल या कलाकारांचा सहभाग होता. 1957मध्ये मेहबूब खान यांनी ‘मदर इंडिया’च्या नावाने या चित्रपटाचा रिमेक केला, हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला.


1952मध्ये बॉलिवूडमध्ये पहिल्यांदा रंगीत होळी खेळली गेली. ही चित्रपटांची पहिली रंगीत होळी होती. चित्रपटाचे नाव होते ‘आन’. अनेक अर्थांनी हा एक मोठा चित्रपट होता. दिलीप कुमार यांनी या चित्रपटात दमदार अभिनय केला आहे. या चित्रपटात दिलीप कुमार आणि निम्मी होळी खेळताना आणि धमाल करताना दिसले. मेहबूब खान या चित्रपटाचे दिग्दर्शक होते. म्हणजे एकंदरीत बॉलिवूडमध्ये होळी खेळण्याचे संपूर्ण श्रेय मेहबूब खान यांना जाते.


राज कपूर यांची होळी असायची खास!


या चित्रपटानंतर ‘होळी’ अनेक चित्रपटांमध्ये दिसली, इतकेच नाही तर होळीचे क्लायमॅक्स सीनही चित्रित करण्यात आला. एक काळ असा होता, जेव्हा बॉलिवूड सेलिब्रिटींच्या खऱ्या आयुष्यातील होळीचीही खूप चर्चा होती. राज कपूर यांच्या होळीची पूर्वी इंडस्ट्रीत वेगळीच क्रेझ असायची. त्यानंतर अमिताभ बच्चन यांच्या होळीचीही खूप चर्चा झाली. आजही बॉलिवूड सेलिब्रिटींच्या होळी सेलिब्रेशनची चर्चा असते.


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha