Wimbledon : भारत म्हणजे क्रिकेट आणि क्रिकेट म्हणजेच भारत असं समिकरण असताना टेनिसच्या दोन खेळाडूंनी आपल्या जादुई खेळामुळे आपलं नाव केलं आणि टेनिस जगतातलं मानाचं विम्बल्डन भारताला मिळवून दिलं. भारताच्या पेस-भूपती या जोडीनं आजपासून बरोबर 22 वर्षांपूर्वी, 4 जुलै 1999 साली विम्बल्डन जिंकण्याची किमया केली होती. त्या घटनेचं स्मरण जरी झालं तर आजही टेनिसप्रेमींच्या अंगावर रोमांच उभा राहतोय. लिअॅन्डर पेस आणि महेश भूपतीने ट्वीट करुन या घटनेची पुन्हा एकदा आठवण करुन दिलीय.


"22 वर्षांपूर्वी आपण विम्बल्डन जिंकणारे पहिले भारतीय बनलो. आपण आपल्या देशाला अभिमान वाटावी अशी कामगिरी करण्याचं स्वप्न पाहिलं होतं, ते पूर्ण केलं" असं लिअॅन्डर पेसने ट्वीट केलं आहे. 


 






त्यावर महेश भूपतीने रिप्लाय केला आणि तो म्हणतो, "होय, ते खूपच स्पेशल होतं. आणखी एकदा वेगळी सुरुवात करायची वेळ आलीय असं तुला वाटतं का?"भूपतीच्या या ट्वीटवर पेसनेही लगेच रिप्लाय केला, "मी नेहमीच तयार आहे, काय आहे प्लॅन"


मानाचं विम्बल्डन जिंकलं
भारतात त्या काळात टेनिस म्हणावं तितकं प्रसिद्ध नव्हतं तरी या खेळातील दोन उगवत्या ताऱ्यांनी भारतीयांचं लक्ष वेधून घ्यायला सुरुवात केली होती. लिअॅन्डर पेस आणि महेश भूपती यांनी दुहेरी प्रकारात एकत्र खेळण्याचा निर्णय घेतला आणि पुढं इतिहास घडला. या दोघांनी मिळून तीन डबल्स पुरस्कार जिंकले आहेत, त्यामध्ये 1999 सालच्या विम्बल्डनचा समावेश होतो. 


टेनिसच्या ग्रॅन्डस्लॅम स्पर्धेच्या अंतिम सामन्यापर्यंत मजल मारणारे ते पहिले भारतीय होते. तसेच 1999 साली डबल्समध्ये ते जागतिक स्तरावर रॅंकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचणारेही पहिलेच भारतीय होते. खाशाबा जाधव यांनी 1952 साली ऑलंपिक पदक मिळवल्यानंतर जागतिक खुल्या स्पर्धेत भारतीय क्रमांक एकवर पोहोचण्याची ही पहिलीच घटना असल्याने ती भारतासाठी अभिमानाची गोष्ट होती.


टेनिस म्हणजे पेस-भूपती हेच नाव भारतीयांच्या तोंडावर असायचं. या दोघांची ती धडाकेबाज खेळी, पॉईन्टस् झाल्यानंतर ते एकमेकांना उडी मारुन चिअर्स करणारी अदा आणि मैदानावरील आक्रमकता ही काही निराळीच होती. पण काही काळानंतर या दोघांत मतभेद झाला आणि त्यांनी एकमेकांसोबत खेळणं बंद केलं. या घटनेनं कोट्यवधी टेनिसप्रेमींना धक्का बसला होता. 2008 नंतर पुन्हा एकदा त्यांनी एकत्रित खेळण्याचा निर्णय घेतला. 


आजही या दोन्ही खेळाडूंनी परत त्याच आवेशात एकत्र खेळावं आणि टेनिसच्या जगतात भारताचं नाव करावं अशीच कोट्यवधी भारतीयांची इच्छा आहे.


महत्वाच्या बातम्या :