मुंबई : साल 2020 मधील पोर्नोग्राफी प्रकरणात मुंबई पोलिसांच्या  सायबर सेलनं दाखल केलेल्या प्रकरणात राज कुंद्राला हायकोर्टानं तूर्तास दिलासा दिला आहे. या केसमध्ये राज कुंद्राला आठवड्याभरासाठी अटकेपासून संरक्षण देण्यात आलं आहे. राज कुंद्रा सध्या मुंबई पोलिसांच्या प्रॉपर्टी सेलनं दाखल केलेल्या प्रकरणात अटकेत असून सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे.


या याचिकेवर बुधवारी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्यासमोर सुनावणी पार पडली. तेव्हा, या प्रकरणातील अन्य आरोपी शार्लिन चोप्रा आणि पुनम पांडे यांच्यासह अन्य आरोपींनाही न्यायालयानं अंतरिम संरक्षण दिले असून पोर्नोग्राफीच्या अन्य एका प्रकरणात आपल्याला याच कलामांतर्गत अटक करण्यात आली आहे. तसेच या तपासदरम्यान इलेक्ट्रॉनिक उपकरणं आणि कागदपत्रंही जप्त करण्यात आली आहेत. त्यामुळे आपल्याला पुन्हा चौकशीसाठी ताब्यात घेण्याची आवश्यकता नसल्याचं कुंद्राच्यावतीनं हायकोर्टात सांगण्यात आलं. त्याला राज्य सरकारच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकिल प्राजक्ता शिंदे यांनी विरोध केला. या प्रकरणात राज कुंद्राची भूमिका इतर आरोपींपेक्षा वेगळी आहे. त्यामुळे तो समानतेच्या आधारावर संरक्षण मागू शकत नाही, अशा दावा करत राज्य सरकारनं आपली बाजू मांडण्यासाठी हायकोर्टाकडे वेळ मागून घेतला. त्याची दखल घेत हायकोर्टानं या प्रकरणात राज कुंद्राला आठवड्याभरासाठी अटकेपासून संरक्षण देत सुनावणी 25 ऑगस्टपर्यंत तहकूब केली.


काय आहे प्रकरण - 


राज कुंद्राविरोधात सायबर गुन्हे शाखेनं गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात पोर्नोग्राफीच्या पहिल्या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. त्यात अटकपूर्व जामीनासाठी राज कुंद्रानं मुंबई सत्र न्यायालयात जामानीसाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, तो अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर त्याला राज कुंद्रानं मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. याप्रकरणी सर्व कागदपत्रं व माहिती तपास अधिकाऱ्यांना देण्यात आली असून सर्व साक्षीदारांचे जबाबही नोंदविण्यात आलेले आहेत. या तपासादरम्यान आपण पोलीस स्थानकांत जाऊन तपासात सहकार्यही केलेलं आहे. अशी माहिती राज कुंद्राच्यावतीनं हायकोर्टात देण्यात आली. 


फेब्रुवारी 2019 मध्ये 'आर्मप्राईम मीडिया प्राईव्हेट लिमिटेड' नामक कंपनीकडून आपल्याशी संपर्क साधला गेला होता. त्या अॅपमार्फत नवोदित प्रतिभावंत कलाकारांना त्यांचा अभिनय डिजिटल माध्यमातून दाखविण्याची संधी देण्यात येणार होती. त्यांची संकल्पना आवडली आणि व्यवसायिक म्हणून आपण त्यात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतल्याचं कुंद्रानं आपल्या याचिकेत म्हटलेलं आहे. त्यानुसार फेब्रुवारी ते डिसेंबर 2019 दरम्यान संबंधित कंपनीशी करार करण्यात आला होता. त्यादरम्यान आपला चित्रपट निर्मितीमध्ये जराही सक्रिय सहभाग नव्हता. तसेच हॉटशॉट्स अॅपमधील पोर्नोग्राफीशीही आपला काहीही संबंध नसून आपल्यावरील आरोप हे खोटे असून आपल्याला यात गोवण्यात आल्याचा दावाही कुंद्रानं कोर्टापुढे केला.


संबंधित बातम्या :