Hemant Dhome On Hindi Language Compaltion : राज्यात हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरुन मोठा वाद पेटला होता. अशातच आता हिंदी सक्तीचा जीआर राज्य शासनाच्या वतीनं मागे घेण्यात आला आहे. रविवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत जीआर मागे घेण्याचा निर्णय घेतला गेला. या बैठकीत शिक्षणमंत्री दादा भुसे यांनींच हिंदीचा मुद्दा मागे घेण्यास भाग पाडल्याचं समजतंय.. बैठकीत हिंदीच्या मुद्द्यावर दादा भुसेंनी विरोध केला. शिंदेंच्या शिवसेनेच्या शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील, प्रताप सरनाईकांचाही विरोध होता. तर भाजपच्या एका मंत्र्यानेही हिंदी भाषेच्या मुद्द्यावर आपलं मत मांडत विरोध दर्शवला. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मत जाणून घेऊन जीआर रद्द करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला. अशातच त्यानंतर हिंदी सक्तीला सुरुवातीपासून विरोध करणाऱ्या शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांनी विजयोत्सवही साजरा केला. अशातच, आता मराठी अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमेनं (Hemant Dhome) महाराष्ट्रातील जनतेच्या आणि विशेषतः मराठी माणसाच्या डोळ्यांत अंजन घालणारी पोस्ट केली आहे.
हेमंत ढोमेनं एक सविस्तर पोस्ट त्याच्या सोशल मीडिया हॅन्डलवर लिहिली आहे. पोस्टमध्ये हेमंत ढोमेनं ही लढाई संपलेली नाही… हा विजय नाही, या तहात हरायचं नाही हे मनाशी बांधून मराठीच्या वाढीसाठी काम केलंच पाहिजे…, असं म्हटलं आहे. तसेच, इथे येणाऱ्या सर्वांनी महाराष्ट्राची ‘मराठी’ शिकण्याची गरज आहे. मराठी भाषेसोबत आता मराठी शाळा अभिजात करणं ही काळाची गरज आहे, असंही म्हटलं आहे.
हेमंत ढोमे नेमकं काय म्हणाला?
मराठमोळा अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणाला की, "मराठी शाळेतल्या तिसऱ्या भाषेच्या सक्ती विरोधात आणि मुळात मराठी भाषेच्या वाढीसाठी, गोडीसाठी डॅा. दीपक पवार यांनी आजच्या कार्यक्रमात अत्यंत मुद्देसूद आणि कठोर शब्दांत आपल्या मागण्या ठेवल्या आहेत. मराठी भाषा केंद्र आणि सर्व समविचारी संस्थाच्या या मागण्या महाराष्ट्राच्या 'मराठी' सरकारला मान्य कराव्याच लागतील. या कार्यक्रमाला उपस्थित राहून पाठिंबा तर दिलाच पण या लढ्यात या सर्वांसोबत शेवटपर्यंत सोबत राहून मला शक्य आहे ते योगदान देत राहीन हा निश्चय देखील केला."
पुढे बोलताना हेमंत ढोमे म्हणाला की, "मराठी भाषेवर आलेल्या या संकटाशी आता दोन हात करण्याची वेळ आली आहे… दुरदृष्टी असणाऱ्या सर्व मराठी प्रेमींना याची पुर्ण कल्पना आहे… स्थलांतरित लोकांची भाषा महाराष्ट्राने नव्हे तर इथे येणाऱ्या सर्वांनी महाराष्ट्राची ‘मराठी’ शिकण्याची गरज आहे. मराठी भाषेसोबत आता मराठी शाळा अभिजात करणं ही काळाची गरज आहे."
"नुकताच शासनानं तुर्तास जीआर रद्द करण्याची घोषणा केलीय आणि समिती स्थापन करून मग त्यांच्या अहवालावर पुढील निर्णय घेण्यात येणार आहे असं आश्वासन दिलंय. ही लढाई संपलेली नाही… हा विजय नाही, या तहात हरायचं नाही हे मनाशी बांधून मराठीच्या वाढीसाठी काम केलंच पाहिजे… आपल्या सर्व मागण्या पुर्ण होतील यासाठी ही चळवळ चालूच ठेवली पाहिजे...", असं हेमंत ढोमे म्हणालाय.
महत्त्वाच्या इतर बातम्या :