Hawahawai : ‘द ग्रेट इंडियन किचन’ (The Great Indian Kitchen) या बहुचर्चित मल्याळम चित्रपटातील अभिनेत्री निमिषा संजयनचं (Nimisha Sajayan) मराठीत पदार्पण होणारा चित्रपट म्हणून 'हवाहवाई'ची (Hawahawai) सध्या जोरदार चर्चा आहे. निमिषासह वर्षा उसगावकर, सिद्धार्थ जाधव, समीर चौघुले अशा दमदार कलाकारांची फौज या चित्रपटात असून, ‘हवाहवाई’ हा चित्रपट येत्या 7 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर मुंबईतील फूड स्टॉल चालवणाऱ्या महिलांच्या हस्ते शिवाजी पार्क येथे लाँच करण्यात आले.


मराठी तारका प्रॉडक्शन्सचे महेश टिळेकर (Mahesh Tilekar) आणि नाईनटिन नाईन प्रॉडक्शन्सचे विजय शिंदे यांनी ‘हवाहवाई’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. महेश टिळेकर यांनी चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन आणि संकलन केलं आहे. महेश टिळेकर यांनी आतापर्यंत अनेक उत्तमोत्तम कौटुंबिक चित्रपट केले असल्याने ‘हवाहवाई’ त्याच मांदियाळीतला आहे.



आशा भोसले यांनी गायले गीत


विशेष म्हणजे ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी वयाच्या 88व्या वर्षी या चित्रपटातलं उडत्या चालीचं एक गाणं ‘हवाहवाई’मध्ये (Hawahawai) गायलं आहे. गायिका उर्मिला धनगर हिच्या ठसकेबाज आवाजातही एक उत्तम गीत रेकॉर्ड करण्यात आले आहे. चित्रपटाचे संगीत पंकज पडघन यांचे असून, चित्रपटातील गीते महेश टिळेकर यांनी लिहिली आहेत. कला दिग्दर्शन नितीन बोरकर यांचे आहे. कार्यकारी निर्माता म्हणून अभिजित अभिनकर यांनी काम पाहिले असून, नृत्य दिग्दर्शन सॅन्डी संदेश यांचे आहे.


‘हवाहवाई’ या चित्रपटातील भूमिका तिला साजेशी असल्यानं निमिषाला मराठीत पहिला ब्रेक देण्याचं ठरवलं, असं  महेश टिळेकर यांनी सांगितलं. साऊथचे चित्रपट इतर भाषेत भाषांतरीत होऊन प्रदर्शित होत असताना, साऊथ मधील उत्तम अभिनय करणाऱ्या कलाकारांना मराठी चित्रपटात आणण्याचा नवा ट्रेण्ड महेश टिळेकर यांनी हवाहवाई सिनेमातून सुरू केला आहे. अनेक नवीन कलाकारांनाही या चित्रपटात संधी देण्यात आली आहे.


दिग्गज कलाकारांची फौज


मल्याळम चित्रपटांमध्ये निमिषा संजयननं (Nimisha Sajayan) सशक्त अभिनेत्री म्हणून ओळख मिळवली आहे. आता ‘हवाहवाई’ (Hawahawai) या चित्रपटाद्वारे ती मराठी चित्रपटांत पदार्पण करत आहे. तिच्यासह अभिनेत्री वर्षा उसगावकर देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. संजीवनी जाधव, किशोरी गोडबोले, समीर चौघुले, अतुल तोडणकर, सिद्धार्थ जाधव, गौरव मोरे, मोहन जोशी, स्मिता जयकर, गार्गी फुले, प्राजक्ता हनमघर, पूजा नायक, सीमा घोगळे, बिपिन सुर्वे, अंकित मोहन या कलाकारांनी विविध भूमिका ‘हवाहवाई’ चित्रपटात साकारल्या आहेत. अतिशय फ्रेश लुक असलेल्या पोस्टर आणि मातब्बर कलाकार यामुळे आता ‘हवाहवाई’ चित्रपट प्रेक्षकांसाठी मनोरंजनांची नक्कीच पर्वणी ठरेल यात शंका नाही.


हेही वाचा :


वयाच्या 88व्या वर्षी सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी गायलं 'हवाहवाई' चित्रपटासाठी गाणं!


Nimisha Sajayan : 'द ग्रेट इंडियन किचन'  फेम निमिषा सजयनची मराठीत एण्ट्री, ‘हवाहवाई’त दाखवणार अभिनयाचा जलवा!