File Number 498 A : "तुझ्यात जीव रंगला" (Tujhyat Jeev Rangala) या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचलेले राणादा आणि पाठक बाई अर्थात हार्दिक जोशी (Hardeek Joshi) आणि अक्षया देवधर (Akshaya Deodhar) ही जोडी आता पहिल्यांदाच चित्रपटात एकत्र दिसणार आहे. 'फाईल नंबर - 498 अ" (File Number 498 A) या चित्रपटात हे दोघं महत्त्वाच्या भूमिकांत दिसणार आहेत.
आरती श्रीधर तावरे यांची निर्मिती असलेल्या आणि मनीष हर्षा मुव्हीज प्रस्तुत मल्हार गणेश दिग्दर्शित "फाईल नंबर 498 अ" या चित्रपटाची कथा श्रीधर तावरे यांनी लिहिली आहे. तर श्रीधर तावरे आणि आशिष निनगुरकर यांनी पटकथा लिहिली आहे. संवाद आणि गीतलेखन आशिष निनगुरकर यांचं आहे. स्वप्नील- प्रफुल्ल यांनी संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी निभावली आहे. कायद्यातील 498 अ या कलमाअंतर्गत एक तरुण कसा अडकतो याची गोष्ट या चित्रपटात मांडण्यात आली आहे. अलीकडेच या चित्रपटाचं पोस्टर लाँच करण्यात आलं होतं.
हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर या जोडीवर महाराष्ट्रानं भरभरून प्रेम केलं आहे. या मालिकेनंतर आता त्यांचा नवा प्रवास सुरू झाला आहे. त्यामुळे ही जोडी पुन्हा कधी एकत्र दिसणार याकडे त्यांच्या चाहत्यांचं लक्ष लागलं होतं. हार्दिक, अक्षयानं पुन्हा एकत्र काम करण्याची चाहत्यांची इच्छा "फाईल नंबर 498 अ" या चित्रपटामुळे पूर्ण होणार आहे. या चित्रपटात हार्दिक आणि अक्षया प्रमुख भूमिकांमध्ये दिसतील. नावापासूनच उत्सुकता निर्माण केलेल्या या चित्रपटातून हार्दिक आणि अक्षया पहिल्यांदाच चित्रपटात एकत्र येणार असल्याने या चित्रपटाविषयीचं कुतूहल अधिकच वाढलं आहे हे नक्की.
हार्दिक आणि अक्षयाने 3 मे रोजी गपचूप साखरपुडा करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती. त्यांचे साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. अनेक सेलिब्रिटींनी आणि चाहत्यांनी त्यांच्या फोटोंवर अभिनंदनाचा वर्षाव केला.
हेही वाचा: