Latur Crime :लातूरमध्ये (Latur) तीन सराईत गुंडांनी रॉड आणि कोयता घेऊन दुचाकीसह चारचाकी वाहनांची तोडफोड करुन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. सद्गुरु नगर आणि दादोजी कोंडदेव नगर इथे हा प्रकार घडला. गुंडांनी वाहनांसह किराणा दुकानेही फोडली. नागरिकांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडल्यानंतर पोलिसांनी वेगाने हालचाल करत या तिघांपैकी दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. तर एकाने तिथून पळ काढला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.


लातूर शहरातील जुना औसा भागातील सद्गुरु नगर आणि दादोजी कोंडदेव नगर इथे मंगळवारी (19 जुलै) रात्री मोठी दशहत निर्माण झाली होती. या भागातील सराईत गुंड हातात कोयता आणि रॉड घेऊन दिसतील ती वाहने फोडत होते. बराच काळ हा प्रकार सुरु होता. अनेक दुचाकी आणि चारचाकी गाड्या या गुंडांनी लक्ष्य केल्या. या भागातील किराणा दुकानेही फोडण्यात आले होते. नशेत बेभान झालेल्या तीन गुंडाचा राड्याचं थरार बराच काळ सुरु होता. याची माहिती शिवाजी नगर पोलीस ठाणे आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याला मिळताच पोलिसांची पथकं घटनास्थळी रवाना झाली. पोलिसांनी यातील दोन गुंडांना अटक केली आहे तर एकाला पळ काढण्यात यश मिळालं. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.


यानंतर संतप्त नागरिकांनी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात मोठी गर्दी केली होती. पोलिसांनी कडक कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतरही नागरिक शांत होत नव्हते. अतिरिक्त पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक यांच्यासह शहरातील सर्व पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी हे फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी कामाला लागले आहेत.


आरोपींवर अनेक गुन्ह्यांची नोंद
या आरोपींपैकी अजिंक्य मुळे याच्यावर 20 पेक्षा अधिक गुन्हे शहरातील विविध पोलीस ठाण्यात दाखल आहेत. उर्वरित दोघांवरही काही गुन्हे दाखल झाले आहेत. मारामाऱ्या करणे, दहशत पसरवणे, तोडफोड करणे असे अनेक गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत. मंगळवारी केलेल्या राड्याचं प्रमाण हे खूप वाढलेले दिसून आले. यामुळे या भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी त्यांना अटक केल्यामुळे नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. परंतु त्यांनी पुन्हा असे कृत्य करु नये, अशी शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.


पोलिसांचं आवाहन
शहर पोलीस उपअधीक्षक जितेंद्र जगदाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, "हे सराईत गुन्हेगार आहेत. दहशत निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला आहे. घटना घडल्यानंतर त्यांना तात्काळ अटक करण्यात आली. पसार झालेल्या आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल. यासारखी कृती जर कोणी करत असेल तर त्याच्यावरही कडक शासन करण्यात येईल." दरम्यान "अशाप्रकारची दहशत निर्माण करणारे कोणी शहरात असतील तर त्याबाबत तात्काळ पोलिसांची संपर्क करावा आणि माहिती द्यावी," असेही आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.