Har Har Mahadev: महाराष्ट्राचे आद्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय इतिहासातील अनन्य साधारण व्यक्तिमत्व बाजीप्रभूंवर चित्रीत करण्यात आलेला 'हर हर महादेव' (Har Har Mahadev) या चित्रपटाची सर्वत्र चर्चा रंगली आहे. या चित्रपटातील दमदार गाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. सर्व रसिकप्रेक्षकांची या गाण्यांना उत्तम दाद मिळत असताना या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला आहे. दमदार कलाकार आणि जबरदस्त गाणी असलेल्या या चित्रपटाचे टीझर राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या मनसेच्या अधिकृत पेजवरून शेअर करण्यात आले आहे. टीझर पाहून प्रेक्षकांची चित्रपटाविषयीची उत्सुकता अजूनच वाढवली आहे.
मराठी चित्रपटसृष्टीत नेहमीच नवनवीन प्रयोग होत राहिले आहेत. यंदा याआधी कधीच न झालेला असा प्रयोग 'हर हर महादेव' या चित्रपटाद्वारे करण्यात आला असून हा सिनेमा फक्त मराठीतच नाही तर पाच भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. सुलतानी अंधार पसरलेला असताना मा जिजाऊंनी स्वातंत्र्यतेचे पाहिलेले स्वप्न, बारा हजार शत्रूंवर विजय मिळवणारे आपले तीनशे मावळे आणि बाजीप्रभूंच्या रणझुंजार कर्तृत्वावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. दिवाळी आणि भारतीय ऐतिहासिक संस्कृती यांचे एक वेगळंच नातं आहे.
पाहा टीझर:
अभिजीत देशपांडे यांचे लेखन आणि दिग्दर्शन असलेल्या 'हर हर महादेव' या चित्रपटाची निर्मिती सुनील फडतरे यांच्या श्री गणेश मार्केटिंग अँड फ्रेंड्स'ची असून यात सुबोध भावे, शरद केळकर ,अमृता खानविलकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. येत्या दिवाळीत 25 ऑक्टोबरला 'हर हर महादेव' सर्वत्र प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट सकारात्मकतेची, शौर्याची, देश प्रेमाची ज्योत पेटवणार यात काही शंकाच नाही. येत्या दिवाळीत पाच भारतीय भाषांमध्ये एकाच दिवशी प्रदर्शित होणारा 'हर हर महादेव' हा पहिलाच मराठी सिनेमा ठरणार आहे. हा सिनेमा अनेक बॉलिवूड सिनेमांना टक्कर देणारा ठरणार आहे.
'हर हर महादेव' या सिनेमात अनेक नामवंत कलाकारांची मांदियाळी असणार आहे. त्यातील एक प्रमुख भूमिकेतील नाव म्हणजे सुबोध भावे. या भूमिकेबद्दल बोलताना सुबोध भावे म्हणाला,"छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की मनात आपसूकच आदराची आणि अभिमानाची भावना निर्माण होते. केवळ मराठी माणूसच नव्हे तर इतर भाषिकांसाठीही अखंड प्रेरणेचं उर्जास्रोत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. अशा या रयतेच्या राजाची भूमिका साकारायला मिळणं ही माझ्यासाठी भाग्याची बाब आहे असे मी मानतो. एक अभिनेता म्हणून आपल्याला कायम काही तरी आव्हानत्मक भूमिका करायला मिळाव्यात अशी कायम इच्छा असते. माझ्यासाठी 'ड्रीम रोल' असलेली ही भूमिका केवळ आव्हानात्मकच नाही तर एक फार मोठी जबाबदारी आहे याची जाणीव मला आहे. हे शिवधनुष्य पेलण्याचा मी इमानेइतबारे प्रयत्न केलेला आहे. दिवसाअंती आनंद आणि समाधान देणाऱ्या काही भूमिका असतात. या भूमिकेने मला तो आनंद ते समाधान आणि जगण्याकडे बघण्याचा एक नवा दृष्टीकोन दिला आहे".
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: