Rohini Hattangadi Birthday: ‘गांधी’ या चित्रपटात कस्तुरबा गांधींची भूमिका साकारत अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी (Rohini Hattangadi) यांनी सगळ्यांचीच वाहवा मिळवली. हिंदी-मराठी-गुजरातीसह इतर भाषिक नाटक आणि चित्रपट गाजवणाऱ्या अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी आज (11 एप्रिल) आपला वाढदिवस साजरा करत आहेत. 11 एप्रिल 1951 रोजी पुण्यात त्यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव अनंत ओक, तर आईचे नाव निर्मला ओक. आई-वडील आणि बंधू रवींद्र ओक तिघेही अभिनयक्षेत्रात कार्यरत होते.


अभिनयाची कौटुंबिक पार्श्वभूमी असल्याने रोहिणीताईंना बालपणापासूनच अभिनयात रुची होती. रेणुकास्वरूप मेमोरिअल गर्ल्स हायस्कूल, पुणे येथे त्यांनी शिक्षण घेतले. शाळेत असल्यापासूनच त्या विविध नाट्यस्पर्धांत भाग घेत असत. पुढे त्यांनी सर परशुरामभाऊ महाविद्यालयातून बी.एस्सी. ही पदवी संपादन केली. नवी दिल्ली येथील ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’  अर्थात एनएसडी येथे त्यांनी 1971पासून तीन वर्षांचे अभिनय प्रशिक्षण घेतले. भरतनाट्यम् नृत्य व कथकली नृत्य या अभिजात भारतीय नृत्यप्रकारांचे सुरेंद्र वडगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी प्रशिक्षण घेतले. जपानी काबुकी नाट्यप्रकारामध्ये, तसेच कर्नाटकातील यक्षगान या लोकनाट्यप्रकारामध्ये काम करणाऱ्या त्या पहिल्या आशियाई महिला होत्या.


खऱ्या आयुष्यात कस्तुरबांशी खास कनेक्शन!


अनेकांच्या आयुष्यात काही न काही योगायोग असतात. रोहिणीताईंच्या आयुष्यातही असाच एक मोठा योगा योग आहे. ‘गांधी’ चित्रपटात कस्तुरबांची भूमिका अजरामर करणाऱ्या रोहिणीताईंची आणि कस्तुरबांची जन्मतारीख एकच! या भूमिकेनेच त्यांना चित्रपट जगतात ओळख मिळवून दिली. 1982मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेची सगळीकडेच वाहवा झाली. त्यांचा ‘गांधी’ हा चित्रपट ऑस्करसाठी देखील निवडला गेला होता. या चित्रपटातील कस्तुरबांच्या भूमिकेसाठी ब्रिटिश ॲकॅडमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन आर्ट्सतर्फे त्यांना सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.


हेही वाचा :