Johnny Depp Birthday : सध्या अभिनेता जॉनी डेप (Johnny Depp) पूर्वाश्रमीची पत्नी एम्बर हर्डसोबतच झालेल्या मानहानीच्या खटल्यामुळे प्रचंड चर्चेत आला आहे. जॉनी डेप आणि एम्बर हर्ड यांच्यात मागील बऱ्याच काळापासून कायदेशीर लढाई सुरू होती, ज्यात जॉनीचा विजय झाला आहे. सध्या जॉनी या यशाचा जल्लोषात साजरा करताना दिसत आहे. दरम्यान, त्याने त्याच्या विजयात आणि वाईट काळात साथ दिल्याबद्दल, सर्व चाहत्यांचे आभार मानले आहेत. अभिनेता आज (9 जून) त्याचा 59वा वाढदिवस साजरा करत आहे.


हॉलिवूड अभिनेता जॉनी डेप याने त्याच्या करिअरमध्ये अनेक संस्मरणीय भूमिका साकारल्या आहेत. ‘कॅप्टन जॅक स्पॅरो’ बनून तो सर्वांचाच लाडका बनला होता. अभिनेत्याच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्याच्या अशाच काही लोकप्रिय भूमिकांबद्दल...


कॅप्टन जॅक स्पॅरो : 'पायरेट्स ऑफ द कॅरिबियन' फ्रँचायझी


'पायरेट्स ऑफ द कॅरिबियन' फ्रँचायझीचे यश केवळ जॉनी डेपमुळेच आहे. त्याने या चित्रपटात ‘कॅप्टन जॅक स्पॅरो’ची भूमिका अप्रतिम साकारली होती. त्याच्यामुळेच या सीरिजचे लोकांना वेड लागल्याचे बोलले जात आहे. या भूमिकेसाठी जॉनीला दोन गोल्डन ग्लोब आणि दोन ऑस्कर नामांकनेही मिळाली होती. मात्र, पूर्वपत्नी एम्बर हर्डच्या आरोपांनंतर त्याला या सीरिजमधून काढण्यात आले.


एडवर्ड सिझरहँड्स : ‘एडवर्ड सिझरहँड्स’


टिम बर्टनच्या 'एडवर्ड सिझरहँड्स' या चित्रपटात जॉनीने एका कृत्रिम माणसाची भूमिका साकारली होती. एडवर्ड नावाचा हा कृत्रिम मानव एका किशोरवयीन मुलीच्या प्रेमात पडतो. या चित्रपटातील पत्रासाठी डेपला पुन्हा एकदा गोल्डन ग्लोब अवॉर्ड्समध्ये या नामांकन मिळाले होते.


द मॅड हॅटर : 'अॅलिस इन वंडरलँड'


'अॅलिस इन वंडरलँड' या परीकथेवर आधारित चित्रपटात जॉनी डेपने ‘मॅड हॅटर’ हे पात्र साकारले होते. त्याच्या अभिनयाने अजरामर झालेले हे पात्र कोणीही कसे विसरू शकेल. या भूमिकेत त्याने आपल्या व्यक्तिरेखेची मानवी बाजू अतिशय चांगल्या पद्धतीने मांडली आहे.


स्वीनी टॉड - 'स्वीनी टॉड: द डेमन बार्बर ऑफ फ्लीट स्ट्रीट'


व्यवसायाने न्हावी असून, सूड घेण्यासाठी आपल्या ग्राहकांना मारणारा ‘स्वीनी टॉड’ प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहिला. या चित्रपटात स्वीनीची भूमिका जॉनी डेपने साकारली होती. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना थक्क करणाऱ्या डेपने यातील एका गाण्यासाठी खास गाण्याचे प्रशिक्षण घेतले होते. ही भूमिका पूर्ण समर्पणाने साकारल्याबद्दल जॉनीला गोल्डन ग्लोब पुरस्कार आणि त्या वर्षी ऑस्करमध्ये नामांकन मिळाले होते.


विली वाँका - 'चार्ली अँड द चॉकलेट फॅक्टरी'


टीम बर्टन दिग्दर्शित 'चार्ली अँड द चॉकलेट फॅक्टरी' या संगीतमय-साहसी चित्रपटात डेपने ‘विली वाँका’ हे पात्र साकारले. या चित्रपटात, त्याने प्रेम, मित्र आणि कुटुंबाच्या शोधात असलेल्या विली वाँकाची भूमिका केली होती. या चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी जॉनी डेपला पुन्हा एकदा गोल्डन ग्लोब नामांकन मिळाले.


हेही वाचा :