अमिताभ बच्चन, आयुष्मान खुराना यांच्या या सिनेमात मुख्य भूमिका आहेत. शुजित सरकार याचे दिग्दर्शक असून काही दिवासंपूर्वीच त्यांनी आपला सिनेमा ओटीटीवर गेला तरी चालेल असं वक्तव्य केलं होतं. गुलाबो सिताबोपाठोपाठ अक्षयकुमारचा लक्ष्मी बॉम्ब हा चित्रपटही ओटीटीवर येणार आहे. त्याशिवाय नवाजुद्दीन सिद्दीकीचा घूमकेतूचे हक्कही ओटीटीने घेतले आहेत. तयार चित्रपट घेण्याकडे अमेझॉन प्राईम आघाडीवर आहे. सोबत नेटफ्लिक्सनेही सिनेमे घेण्यासाठी कंबर कसली आहे. कतरिना कैफचा सुपरहिरो हा चित्रपटही नेटफ्लिक्स घेणार असल्याच्या बातम्या आहेत. यापूर्वी इरफान खानचा अंग्रेजी मिडियम हा चित्रपट ओटीटीने घेतला होता. हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर दोनेक दिवसांतच लॉकडाऊनमुळे थिएटर्स बंद करावी लागली होती. त्यामुळे त्यानंतर हा चित्रपट ओटीटीवर रिलीज करण्यात आला. तर मराठीमध्ये एबी आणि सीडी हा चित्रपटही ओटीटीवर आला आहे.
ओटीटी म्हणजे काय?
ओटीटी म्हणजे ओव्हर द टॉप सर्व्हिस. आजतागायत आपण सगळे कार्यक्रम केबल किंवा डिश टीव्ही द्वारे पाहातो. तर ओटीटी म्हणजे थेट इंटरनेट किंवा हायस्पीड डेटा केबल द्वारे प्रेक्षक थेट कार्यक्रमांचा आस्वाद घेऊ शकतात. कोणत्याही इतर उपकरणाशिवाय केवळ इंटरनेट द्वारे थेट प्रेक्षकांपर्यंत पोचणारा प्लॅटफॉर्म म्हणजे ओटीटी प्लॅटफॉर्म. नेटफ्लिक्स, एमेझॉन प्राईम,, हॉटस्टार, य़ू ट्युब हे ओटीटी प्लॅटफॉर्म गणले जातात.