मुंबई : धर्मवीर, स्वराज्यरक्षक, छत्रपती संभाजी महाराज यांचं जीवन आणि त्यांनी केलेला संघर्ष आपणा सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. संभाजी महाराजांचा जन्म 14 मे 1657 रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषाचे पुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले.


छत्रपती संभाजी महाराजांबद्दल काही महत्वाच्या गोष्टी

अनेक ऐतिहासिक नोंदींप्रमाणे संभाजीराजे अत्यंत देखणे आणि शूर होते. राजकारणातील बारकावे त्यांनी भराभर आत्मसात केले. मोंगल दरबारातील घडामोडी आणि राजकारण त्यांना लहान वयातच कळले तर त्याचा त्यांना भविष्यात उपयोग होईल या विचाराने शिवाजी महाराजांनी त्यांना आग्रा भेटीच्या वेळी बरोबर नेले. त्यावेळी संभाजीराजे 9 वर्षाचे होते. शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेतून निसटल्यानंतर स्वराज्यापर्यंतची धावपळ संभाजी राजांना सोसली नसती आणि त्यामुळे त्यांना काही काळ सुरक्षित ठिकाणी ठेवणे गरजेचे होते.त्यामुळे शिवाजी महाराजांनी त्यांना मोरोपंत पेशव्यांच्या मेहुण्याच्या घरी मथुरेला ठेवले. मोगली सैनिकांचा संभाजी महाराजांच्या मागचा ससेमिरा थांबवण्याच्या उद्देशाने शिवाजी महाराजांनी संभाजीराजांचे निधन झाल्याची अफवा पसरवून दिली. ते स्वराज्यात पोहोचल्यानंतर काही काळाने संभाजीराजे सुखरूपपणे स्वराज्यात येऊन पोहोचले.

1674 मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तोपर्यंत संभाजीराजे राजकारणातील बारकावे आणि रणांगणातील डावपेचांमध्ये तरबेज झाले होते. त्यांच्या विनम्र स्वभावाने राज्याभिषेकासाठी रायगडावर आलेल्या प्रतिनिधींना जिंकून घेतले.

16 जानेवारी 1681 मध्ये संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला.

औरंगजेबाने 1682 मध्ये स्वराज्यावर हल्ला केला. औरंगजेबाचे सामर्थ्य सर्वच बाबतीत संभाजीराजांपेक्षा जास्त होते. त्याचे सैन्य स्वराज्याच्या सैन्याच्या पाचपटीने जास्त होते तर त्याचे राज्य स्वराज्यापेक्षा कमीतकमी 15 पटींनी मोठे होते. संभाजीराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी सर्व शत्रूंशी एकहाती झुंज दिली.

संभाजीराजे धाडसी आणि हजरजबाबी होते. त्यांच्या हजरजबाबी आणि रोखठोक बोलण्यामुळेच त्यांना स्वराज्यात देखील बरेच शत्रू निर्माण झाले होते.

औरंगजेबाचा चौथा मुलगा अकबर ह्याने जेव्हा औरंगजेबा विरुद्ध बंड केले तेव्हा त्याला संभाजी महाराजांनी आसरा दिला होता.

1689 च्या सुरवातीला संभाजीराजांनी त्यांच्या महत्त्वाच्या सरदारांना बैठकीसाठी कोकणातसंगमेश्वर येथे बोलावले. ती बैठक संपवून संभाजीराजे रायगडाकडे रवाना होत असतानाच त्यांचा मेहुणा गणोजी शिर्के आणि औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान यांनी संगमेश्वरवर हल्ला केला. या कारवाईसाठी गणोजी शिर्केने कमालीची गुप्तता बाळगली आणि सर्व कारवाईची आखणी खूपच काळजीपूर्वक केली. मराठ्यांत आणि शत्रूचे सैन्यात चकमक झाली. मराठ्यांचे संख्याबळ कमी होते.प्रयत्‍नांची शर्थ करूनही मराठे शत्रूचा हल्ला परतवून लावू शकले नाहित. शत्रूने संभाजीराजांना जिवंत पकडले.

त्यानंतर संभाजीराजे आणि त्यांचे सल्लागार कवी कलश यांना औरंगजेबापुढे बहादूरगड आता धर्मवीरगड येथे आणण्यात आले. औरंगजेबाने संभाजीराजांना सर्व किल्ले त्याच्या स्वाधीन करून धर्मांतर केल्यास जीवदान देण्याचे मान्य केले. पण संभाजीराजांनी त्याला स्पष्टपणे नकार दिला. संभाजीराजांनी शरणागती पत्करण्यास नकार दिला. तेव्हा औरंगजेबाने त्यांना क्रूरपणे अत्यंत हालहाल करून ठार मारायचा आदेश दिला. सुमारे 40 दिवसांपर्यंत असह्य यातना सहन करूनही संभाजीराजांनी स्वराज्यनिष्ठा आणि धर्मनिष्ठा सोडली नाही.

11 मार्च 1689 रोजी संभाजीराजांची भीमा आणि इंद्रायणी नदीच्या संगमावरील तुळापूर येथे हत्या करण्यात आली.

(बातमी स्त्रोत- विकिपीडिया आणि shivpratap96.weebly.com)