Gulabi Sadi Song : सध्या सोशल मीडियावर एका गाण्याने अक्षरश: वेड लावलंय. अगदी 70 आजींपासून ते बॉलीवूड आणि मराठी सिनेसृष्टीतल्या अभिनेत्री, अभिनेत्यांना देखील गुलाबी साडी (Gulabi Sadi) या गाण्याची भुरळ पडली आहे. या गाण्यावरचे रिल्स सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतायत. इतकच नव्हे तर हे गाणं यंदाच्या फिल्मफेअर मराठी पुरस्कार 2024 च्या मंचावर देखील सादर करण्यात आलं. त्यामुळे सध्या याच गाण्याची हवा सगळीकडे पाहायला मिळतेय. 


संजू राठोड याने हे गाणं लिहिलं असून त्यानेच हे गाणं गायलं आहे. 'गुलाबी साडी' या गाण्याची जगभरात क्रेझ पाहायला मिळतेय. अनेक ट्रेंडिग रिल्स या गाण्यावर तुफान व्हायरल होताना पाहायला मिळतेय. या गाण्याचे बोल आणि गाण्याच्या हुकस्टेपने साऱ्यांनाच वेड केलं. पण संजू राठोडला हे गाणं कसं सुचलं याबद्दल त्याने नुकतच भाष्य केलं आहे. 


असं तयार झालं गुलाबी साडी गाणं


संजूने नुकतच सकाळ वृत्तवाहिनीसोबत संवाद साधताना यावर भाष्य केलं आहे. त्याने म्हटलं की, गुलाबी साडी हे गाणं मी दिवाळीच्या दिवशी लिहिलं. माझ्या डोक्यात चालू होतं काय करायचं, तेव्हा माझ्या काही कारणांमुळे मी दिवाळीला घरी देखील नव्हतो गेलो. मग घरी बसून काय करायचं हा विचार सुरु होता. तेव्हा वाटलं की नवीन काहीतरी शोधूया. तेव्हा वाटलं की प्रेमाचा रंग हा गुलाबी असतो आणि नऊवारी साडी हे गाणं होतंच. मग नऊवारी साडीचा सिक्वेल आहे तर त्याच्याशीच संबंधित गाणं हवं. म्हणून मग मी गुलाबी साडी हे गाणं तयार केलं. 


गुलाबी साडीनंतर संजू राठोडचं नवं गाणं


'गुलाबी साडी'  या गाण्याच्या भरघोस प्रतिसादानंतर संजू राठोड आणि 'बिग हिट मीडिया' एक नवंकोरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आलं आहे. या गाण्यात 'लागीर झालं जी' फेम अभिनेता नितीश चव्हाण आणि नृत्यांगना वैष्णवी पाटील थिरकताना दिसत असून संजू राठोडच्या रॅपने साऱ्यांची बोलतीच बंद केली आहे. तर या गाण्यात सहकलाकार म्हणून  हृतिक मनी आणि निमरित मनी यांनीही ठेका धरलेला पाहायला मिळतोय. 'Bride तुझी नवरी' हे गाणं संजू राठोडचं असून  'बिग हिट' मीडिया प्रस्तुत आहे.    


ही बातमी वाचा : 


Pushkar Shrotri : पुष्कर श्रोत्रीचं 55 व्या वाढदिवशी 55 वं नाटक रंगभूमीवर; साकारणार 10 फुटी व्यक्तिरेखा