Manju Singh : हिंदी चित्रपटसृष्टीतून पुन्हा एकदा दु:खद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ हिंदी टेलिव्हिजन प्रेझेंटर आणि अभिनेत्री मंजू सिंह (Manju Singh) यांचे निधन झाले. याबाबत माहिती देताना गीतकार, गायक आणि पटकथा लेखक स्वानंद किरकिरे यांनी मंजू सिंह यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर एक पोस्ट शेअर करताना, त्यांनी दूरदर्शनमध्ये त्यांच्यासोबत काम केलेल्या वेळेची आठवण केली.


स्वानंद यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘मंजू सिंह आता आपल्यात नाहीत! दूरदर्शनसाठी स्वराज हा कार्यक्रम लिहिण्यासाठी मंजूजींनी मला दिल्लीहून मुंबईत आणले! डीडीसाठी त्यांनी एक कहानी, शो टाईम इत्यादी अनेक अप्रतिम शो केले होते. हृषीकेश मुखर्जींच्या गोलमालची रत्ना आमच्या आवडत्या मंजू जी आम्ही तुमचे प्रेम कसे विसरु शकतो…अलविदा!’


पाहा पोस्ट :



मंजू सिंह हे भारतीय टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव होते. त्यांनी ‘स्वराज’, ‘एक कहानी’, ‘शो टाईम’ इत्यादी कार्यक्रमांची निर्मिती केली. प्रेमाने 'दीदी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंजू 'खेल खिलौने' या लहान मुलांच्या शोच्या अँकर देखील होत्या. हा शो सुमारे सात वर्षे चालला. याशिवाय मंजू सिंह हृषिकेश मुखर्जींच्या ‘गोलमाल’ या चित्रपटातही दिसल्या होत्या, ज्यामध्ये त्यांनी ‘रत्ना’ची भूमिका साकारली होती.


त्यांनी 1983 मध्ये ‘शो टाईम’द्वारे टेलिव्हिजन निर्माता म्हणून पदार्पण केले. त्यांचा ‘एक कहानी’ हा कार्यक्रम अनेक प्रादेशिक भाषांमधील साहित्यिक लघुकथांवर आधारित होता. देशभरातील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळालेली आणखी एक मालिका म्हणजे त्यांची माहितीपट-नाटक सिरीज ‘अधिकार’, जी महिलांच्या कायदेशीर हक्कांवर आधारित होती.


अलीकडच्या काळात मंजू सिंह लहान मुलांसाठी आणि तरुणांसाठीच्या अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांशी संबंधित होत्या. 2015मध्ये, सर्जनशील कला आणि शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी त्यांना नावाजले गेले आणि भारत सरकारने त्यांची केंद्रीय शिक्षण सल्लागार मंडळ (CABE) सदस्य म्हणून नेमले होते.


हेही वाचा :