Cheslie Kryst Death : माजी मिस यूएसए चेस्ली क्रिस्ट (Cheslie Kryst) हिने मॅनहॅटनमध्ये आत्महत्या करत आपले आयुष्य संपवले आहे. क्रिस्टने 60 मजली ओरियन इमारतीवरून उडी मारल्याचे सांगितले जात आहे. याच इमारतीच्या नवव्या मजल्यावर तिचे अपार्टमेंट होते. इमारतीच्या 29व्या मजल्यावरील टेरेसवर तिला अखेरचे पाहिले गेले होते.


चेस्ली क्रिस्टने आत्महत्या करण्यापूर्वी सोशल मीडियावर एक संदेश पोस्ट केला होता. तिने इंस्टाग्रामवर लिहिले की, ‘May this day bring you rest and peace’. 30 वर्षीय चेस्लीला तिच्या कामासाठी दोन वेळा एमी नामांकन मिळाले होते. क्रिस्ट ही वकील देखील होती. तिने अमेरिकेच्या न्याय व्यवस्थेत सुधारणा करण्यास मदत केली होती. तिला दोन विद्यापीठातून तीन पदव्या देखील मिळाल्या होत्या.


नॉर्थ कॅरोलिना येथील रहिवासी असलेल्या, क्रिस्टने एका लॉ फर्मसाठी दिवाणी खटल्याचा सराव केला आणि ज्या कैद्यांना अन्यायकारक शिक्षा झाली असेल, त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम केले.


आत्महत्येचे कारण अस्पष्ट


मिडटाउन मॅनहॅटनमधील या गगनचुंबी इमारतीच्या नवव्या मजल्यावर अपार्टमेंट असलेल्या क्रिस्टने सकाळी 7:15च्या सुमारास याच इमारतीवरून उडी मारली. यानंतर ती बर्फाच्छादित पदपथावर मृतावस्थेत आढळून आली. पोलिसांना तिच्या अपार्टमेंटमध्ये एक चिठ्ठी सापडली, ज्यामध्ये तिने आपले सर्व काही आईकडे सोपवण्याबद्दल लिहिले आहे. मात्र, या चिठ्ठीत आत्महत्येचे कारण लिहिलेले नाही.


कुटुंबकडून जाहीर करण्यात आलेल्या निवेदनात म्हणण्यात आले आहे की, ‘आपल्या सगळ्यांच्या प्रिय चेस्लीच्या निधनाबद्दल आम्ही दु:ख व्यक्त करतो. तिने जगभरातील लोकांना तिच्या सौंदर्य आणि सामर्थ्याने प्रेरित केले. तिने नेहमी सर्वांची काळजी घेतली, प्रेम केले, ती हसली आणि ती चमकली.’ चेस्ली क्रिस्ट अनेकदा तिच्या इन्स्टाग्राम फॉलोअर्ससोबत तिच्या भावना शेअर करत असे.


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha