कानपूर : उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यात रविवारी रात्री भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सहा जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. शहरातील बाबुपुरवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ताटमिल चौकाजवळ एका भरधाव बसने अनेकांना चिरडले. या घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की पाहणाऱ्यांच्या पायाखालची जमीन हादरली. कानपूरमध्ये इलेक्ट्रिक बसचा मोठा अपघात झाला आहे. रविवारी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास ही इलेक्ट्रिक बस घंटाघर चौकातून टाटमिलच्या दिशेने भरधाव वेगाने जात होती. पूल उतरताच चालकाने बस विरुद्ध दिशेनं चालवण्यास सुरुवात केली. यावेळी समोर येणाऱ्या प्रत्येक वाहनांना जोरदार धडक देत ही बस पुढे जात होती. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. जखमींवर उपचार करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


इलेक्ट्रिक बसची 17 वाहनांना धडक
इलेक्ट्रिक बसने 17 वाहनांना धडक दिली आहे. या अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 12 जण जखमी झाले आहेत. (जखमींपैकी 7 जणांना ताटमिल इथल्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये तर चार जणांना हॅलेट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे). यातील अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. तर ई-बसचा चालक संधी मिळताच पसार झाला आहे.


राष्ट्रपतींनी व्यक्त केला शोक
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट केले आहे ही, "कानपूर बस दुर्घटनेत अनेकांचा बळी गेल्याच्या वृत्ताने खूप दुःख झाले आहे. या घटनेत ज्यांनी आपले प्रियजन गमावलल्यांच्या कुटुंबीयांप्रती माझ्या संवेदना आहेत. जखमींनी लवकरात लवकर बरे व्हावे अशी माझी इच्छा आहे."






मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केला शोक
योगी आदित्यनाथ यांनी 'कू' अ‍ॅपवर पोस्ट केले आहे की, ''कानपूरमध्ये रस्ते अपघातात लोकांचा मृत्यू होणे हे अतिशय दुःखद आहे. ईश्वराने दिवंगत आत्म्यांना आपल्या चरणी स्थान देवो. नुकसान सहन करण्याची शक्ती शोकाकुल कुटुंबीयांना देवो. जखमींना सर्व वैद्यकीय मदत देण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.''







 



इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha