Filmfare Marathi Awards 2026 Show: फिल्मफेअर अवॉर्ड्स मराठी 2026च्या (Filmfare Marathi 2026) माध्यमातून 6 ऑगस्ट 2026 रोजी वर्ष 2025 मधील मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट प्रतिभेचा गौरव करण्यात आला. अमेय वाघ आणि सिद्धार्थ चांदेकर या जोडीने या सोहळ्याचे सूत्रसंचालन केले. संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टी एकाच छताखाली एकत्र आल्याने हा पुरस्कार सोहळा अत्यंत दिमाखात पार पडला. 'आता थांबायचं नाय!' (Aata Thambaycha Naay) या चित्रपटाने विविध श्रेणींमध्ये 8 पुरस्कार पटकावत अव्वल स्थान मिळवले. यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (शिवराज वायचळ), सहाय्यक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेता (पुरुष), सर्वोत्कृष्ट संगीत अल्बम, सर्वोत्कृष्ट गीतकार, सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक (पुरुष आणि स्त्री) आणि सर्वोत्कृष्ट संवाद या पुरस्कारांचा समावेश आहे.

Continues below advertisement

सर्वाधिक पुरस्कार मिळाल्याबद्दल बोलताना दिग्दर्शक शिवराज वायचळ यांनी आपल्या संपूर्ण टीमचे आभार मानले आणि प्रेक्षकांसोबत एक वैयक्तिक आठवण शेअर केली. त्यांचे वडील (जे एक छायाचित्रकार होते) यांनी 8 वर्षे फिल्मफेअर पुरस्कार आणि मंचाचे छायाचित्रण केले होते आणि टीव्ही टेलिकास्टदरम्यान वडिलांची एक झलक पाहण्यासाठी ते कशी वाट पाहत असत, हे त्यांनी सांगितले. आज हे नवे स्वप्न पूर्ण झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

मुख्य भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेता (पुरुष) या पुरस्काराने दिलीप प्रभावळकर यांना सन्मानित करण्यात आले. अभिनय बेर्डे, सिद्धार्थ मेनन, सिद्धार्थ जाधव, सिद्धार्थ चांदेकर आणि अमेय वाघ या चित्रपटसृष्टीतील तरुण कलाकारांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. उपस्थितांनी उभे राहून (Standing Ovation) त्यांचा आदर सत्कार केला. हा पुरस्कार स्वीकारताना दिलीप प्रभावळकर म्हणाले की, या सर्व तरुण कलाकारांकडून हा पुरस्कार स्वीकारताना त्यांना अत्यंत आनंद होत आहे, आणि हा प्रवास इथेच थांबणार नसून पुढे असाच सुरू राहील.

Continues below advertisement

या सोहळ्यातील सर्वात भावूक क्षणांपैकी एक म्हणजे ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांना त्यांच्या सहा दशकांच्या मराठी चित्रपटसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २८ चित्रपटांचे दिग्दर्शन करत त्यांनी समाजातील अनेक न बोलल्या गेलेल्या संघर्षांना पडद्यावर आणले आणि मराठी सिनेमाचा मजबूत पाया घातला.

राजदत्त यांच्या सन्मानप्रसंगी अभिनेते सचिन पिळगांवकर यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देत सांगितले, "फिल्मफेअर पुरस्कार मराठीने आमच्या दत्ता काकांचा सन्मान केल्याबद्दल मी मनापासून आभारी आहे. त्यांचे पूर्ण नाव दत्ता मयाळू असले तरी दिग्दर्शक झाल्यानंतर त्यांनी आपल्या गुरु राजा परांजपे यांच्यावरील आदर म्हणून त्यांच्या नावातील ‘राज’ आपल्या नावापुढे जोडले आणि ते ‘राजदत्त’ म्हणून ओळखले जाऊ लागले. मी साडेचार-पाच वर्षांचा असताना ते राजा परांजपे यांचे प्रमुख सहाय्यक होते. रात्रीच्या शूटिंगवेळी मला थंडी वाजली की ते मला उचलून स्टुडिओच्या मोठ्या दिव्याजवळ घेऊन उभे राहत. त्या वेळी अनेक वर्षांनी मला त्यांनाच जीवनगौरव पुरस्कार देण्याचा सन्मान मिळेल, असे कधी वाटले नव्हते. दत्ता काका, माझ्या आयुष्यातील तुमचे योगदान अमूल्य आहे. तुमच्या प्रेमासाठी, मार्गदर्शनासाठी आणि योगदानासाठी मनःपूर्वक धन्यवाद."

या सोहळ्याची सुरुवात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. मराठी चित्रपटसृष्टीच्या यशाचा गौरव करत त्या म्हणाल्या, "आज फिल्मफेअर पुरस्कार मराठीमध्ये उपस्थित राहणे माझ्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. आजचा दिवस आपल्या कथाकार, दिग्दर्शक, कलाकार, लेखक आणि प्रत्येक सर्जनशील व्यक्तीच्या कार्याचा गौरव करणारा आहे. ‘उठा, जागे व्हा आणि ध्येय गाठल्याशिवाय थांबू नका’ हे ब्रीद मराठी चित्रपटसृष्टीने खऱ्या अर्थाने जगले आहे. मर्यादित बजेट आणि अनेक अडचणी असूनही मराठी चित्रपटसृष्टीने जिद्दीने वाटचाल केली आहे. आज मराठी सिनेमा केवळ महाराष्ट्रात किंवा भारतातच नव्हे, तर जागतिक स्तरावरही आपली ओळख निर्माण करत आहे. आपल्या कथा आणि कलेतून समाजात सकारात्मक बदल घडवण्याची ताकद तुमच्यात आहे."

या सोहळ्याला अमृता फडणवीस, अनन्या पांडे, अभिषेक बॅनर्जी, सचिन पिळगांवकर, श्रिया पिळगांवकर, रिंकू राजगुरू, रेणुका शहाणे, प्रिया बापट, नेहा पेंडसे, सिद्धार्थ जाधव, अभिजीत सावंत, भरत जाधव, पूनम पांडे, अर्शी खान यांच्यासह चित्रपट आणि संगीत क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

फिल्मफेअर पुरस्कार मराठी 2026 विजेते (Filmfare Marathi Awards 2026)

सर्वोत्कृष्ट चित्रपट: आता थांबायचं नाय!सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक: शिवराज वायचळ (आता थांबायचं नाय!)सर्वोत्कृष्ट चित्रपट (समीक्षक): जयंत दिगंबर सोमाळकर (स्थळ – अ मॅच), रोहन परशुराम कानवडे (साबर बोंडा)सर्वोत्कृष्ट अभिनेता (मुख्य भूमिका): दिलीप प्रभावळकर (दशावतार)सर्वोत्कृष्ट अभिनेता (समीक्षक): भूषण मनोज (साबर बोंडा), तारणाथ खिरटकर (स्थळ – अ मॅच)सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (मुख्य भूमिका): अमृता सुभाष (जारण), हृता दुर्गुळे (आरपार)सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (समीक्षक): नंदिनी चिकटे (स्थळ – अ मॅच)सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता: सिद्धार्थ जाधव (आता थांबायचं नाय!)सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री: अनिता दाते (जारण)सर्वोत्कृष्ट संगीत अल्बम: गुलराज सिंह, सौरभ भालेराव (आता थांबायचं नाय!)सर्वोत्कृष्ट गीत: मनोज यादव (टायटल ट्रॅक – आता थांबायचं नाय!)सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक: अजय गोगावले (टायटल ट्रॅक – आता थांबायचं नाय!)सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका: निहिरा जोशी देशपांडे (चल रे मना जाऊ – आता थांबायचं नाय!)सर्वोत्कृष्ट कथा: जयंत दिगंबर सोमाळकर (स्थळ – अ मॅच)सर्वोत्कृष्ट पटकथा: संतोष दवाखर (गोंधळ)सर्वोत्कृष्ट संवाद: शिवराज वायचळ, ओंकार गोखले, अरविंद जगताप (आता थांबायचं नाय!)सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत: इलैयाराजा (गोंधळ)सर्वोत्कृष्ट ध्वनी संकल्पना: जयेश ढाकण (गोंधळ)सर्वोत्कृष्ट छायांकन: अमलेंदू चौधरी (गोंधळ)सर्वोत्कृष्ट कलादिग्दर्शन: संजीव राणे (दशावतार)सर्वोत्कृष्ट संकलन: अभिजित देशपांडे (स्थळ – अ मॅच)सर्वोत्कृष्ट वेशभूषा: सचिन लोवळेकर (दशावतार)सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन: स्टॅन्ली डी'कोस्टा (टकुंबा – एप्रिल मे ९९)सर्वोत्कृष्ट नवोदित दिग्दर्शक: सुभोध खानोलकर (दशावतार), रोहन मापुसकर (एप्रिल मे ९९)सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेता: कुणाल शुक्ला (तीन पायांचा घोडा), निशाद भोईर (गोंधळ)सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेत्री: साजिरी जोशी (एप्रिल मे ९९), इशिता देशमुख (गोंधळ)सर्वोत्कृष्ट मेक-अप: रोहित महाडिक (दशावतार)सर्वोत्कृष्ट बालकलाकार: कृष मोरे (खालिद का शिवाजी)जीवनगौरव पुरस्कार: राजदत्त

महत्त्वाच्या इतर बातम्या:

Thalapathy Vijay Sangeetha: मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली