Washim Crime News : वाशिम (Washim) जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. सैन्यदलात असणाऱ्या लष्कर जवानाने आपल्या 7 महिन्यांच्या गर्भवती पत्नीची हत्या केली घटना समोर आली आहे. या घटनेनं वाशिम जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मृत महिलेच्या भावाच्या फिर्यादीवरून हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पतीसह सासु सासऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे.
वाशिम जिल्ह्यात खळबळ
कारंजामधील शिवनगर येथे भारतीय सैन्यात कार्यरत असलेल्या लष्कर जवानाने आपल्या सात महिन्याची गर्भवती असलेल्या पत्नीची हत्या केल्याची घटना घडली आहे. यामुळं वाशिम जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मृत महिलेच्या भावाच्या फिर्यादीवरुन या प्रकरणी खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सैन्याच्या 6 व्या मराठा बटालियनमध्ये कार्यरत असलेला 28 वर्षीय पती ज्ञानेश्वर मदने आणि त्याच्या आईवडिलांना पोलिसांनी अटक केली आहे. महिलेच्या भावाने दिलेल्या फिर्यादी नुसार, काल दुपारच्या दरम्यान ज्ञानेश्वर मदने यांनी फोन कॉलद्वारे माहिती देत सांगितले की, मृत दिपाली घरातील काम करत असताना पडल्यानं तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
ज्ञानेश्वर मदनेचे दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध असल्याचाही आरोप
मृत महिला दीपालीचा भाऊ आणि आईवडीलांना माहिती मिळताच मध्यप्रदेशच्या बुऱ्हाणपूर येथून कारंजा इथं आले तेव्हा दीपाली त्यांना मृत अवस्थेत आढळून आली. महिलेचा भाऊ राहुल माने यानं आरोप करत सांगितले की, ज्ञानेश्वर मदने याचे दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध होते, त्यामुळं तो दीपालीचा छळ करत होता. काही महिन्यांपूर्वी या प्रकरणी दोन्ही कुटुंबांमध्ये समझोता बैठक झाली होती. परस्पर सामंजस्यानं हे प्रकरण मिटवण्यात आलं होतं. मात्र, अखेर दीपालीची हत्या करुन सासरी मंडळीने पिच्छा सोडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत दीपालीच्या गळ्यावर असलेल्या खुणा बघून त्यांना संशय आल्यानं हत्याच केल्याचं कळते, त्या वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे.
धाराशिव जिल्ह्यातील परांडा शहरात दोन गटात भर दुपारीच तुंबळ हाणामारी
धाराशिव जिल्ह्यातील परांडा शहरात दोन गटात भर दुपारीच तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. हातात लाठ्या काट्या तसेच दगडाने ही हाणामारी झाली आहे. हाणामारीचे व्हिडिओ हे मोबाईलमध्ये देखील चित्रित करण्यात आले आहेत. एकमेकाकडे पाहण्याच्या कारणावरून सुरु झालेला शाब्दिक वाद हाणामारी पर्यंत जाऊन पोहोचला आहे.
राजकीय वादातूनच हे भांडण झाल्याची माहिती
भांडणाचं कारण हे अद्याप कळू शकलं नसलं तरी राजकीय वादातूनच ही भांडण झाली असल्याचं बोलले जात आहे. भर दुपारी भर चौकात भांडण सुरू झाल्याने परंडा शहरात एकच गोंधळ उडाला होता. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून ज्यांनी रस्त्यावर गोंधळ घातला आहे, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान या हाणामारीत अनेक जण जखमी झाले असले तरी पोलीस भीतीने हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेले नसल्याचे समजत आहे. पोलिसांनी शहरात आता बंदोबस्त वाढवला आहे.