Filmfare Awards 2021 फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याला फक्त कलाविश्वातच नव्हे, तर चाहत्यांच्या वर्तुळातही एक वेगळं स्थान आहे. एक आपुलकीची भावना या पुरस्कार सोहळ्याप्रती पाहायला मिळते. नुकतंच फिल्मफेअर पुरस्काराचं 66 वं पर्व पार पडलं आणि त्यानंतर या सोहळ्याचं प्रक्षेपणही टेलिव्हिजनवर करण्यात आलं. या पुरस्कार सोहळ्यात भावभावनांची विविध रुपं पाहायला मिळाली. कुठे ओसंडून वाहणारा आनंद दिसला, तर कुठे दु:खाचा बांध फुटल्याचंही पाहायला मिळालं. 


अभिनेता इरफान खान यांना त्यांच्या अंग्रेजी मीडियम या चित्रपटातील भूमिकेसाठी मृत्यूपश्चात सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून पुरस्कार जाहीर झाला. शिवाय जीवनगौरव पुरस्कारानंही त्यांच्या कलेला सलाम करण्यात आला. याच क्षणांचा एक व्हिडीओ फिल्मफेअरच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवर पोस्ट करण्यात आला. हा व्हिडीओ सध्या अनेकांच्याच डोळ्याच्या कडा पाणावत आहे. 


Major Teaser: पाहा शहीद मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या शौर्यगाथेची एक झलक


वडिलांच्या नावे घोषित झालेल्या पुरस्कारांचा स्वीकार करण्यासाठी आलेल्या इरफान खान यांचा मुलगा बाबिल याला यावेळी अश्रू अनावर झाले. अभिनेता आयुष्यामन खुराना यानं इरफान खान यांच्यासाठी काही ओळी म्हटल्या आणि या अष्टपैलू कलाकाराची ओळख सर्वांना करुन दिली. ज्यानंतर व्यापीठावर येत पुरस्कार स्वीकारत बाबिलनं फार काही न बोलता, आपला सर्वांनीच खुल्या मनानं स्वीकार केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. 






बाबिल आपल्या स्थानी पुन्हा गेल्यानंतर फिल्मफेअरकडून इरफान खान यांच्या कार्याचा आढावा एका सुरेख अशा व्हिडीओच्या माध्यमातून घेण्यात आला. यावेळी मात्र वडिलांची झलक पाहून बाबिलला त्याच्या भावना रोखता आल्या नाहीत. त्याच्या डोळ्यांतून अश्रू घरंगळले, फक्त बाबिलच नव्हे तर आपल्याला सोडून गेलेल्या या हरहुन्नरी कलाकाराच्या आठवणीनं राजकुमार रावसह उपस्थित सर्वच सेलिब्रिटी भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.