Farmers Protests अर्थात शेतकरी आंदोलनं सुरु झाल्या दिवसापासून त्यातील प्रत्येक वळण हे प्रकाशझोतात येत आहे. त्यातही कलाकारांनीही यामध्ये आपल्या भूमिका ठामपणे मांडण्यास सुरुवात केल्यामुळं आता कलाविश्वातही या आंदोलनाचे पडसाद उमटताना दिसत आहेत. याच शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अभिनेत्री कंगना रनौत हिनं पुन्हा एकदा एक लक्षवेधी ट्विट केलं आहे. हे ट्विट करत (kangana ranaut) कंगनानं एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये ती वारंवार आपल्या देशभक्तीवरच प्रश्न का उपस्थित केला जातो आणि मलाच देशभक्ती सिद्ध का करावी लागते, असा थेट सवाल करत आहे.
प्रियांका चोप्रा आणि दिलजीत दोसांज यांच्या मनसुब्यांवर केव्हाच प्रश्न का उपस्थित केले जात नाही, असं म्हणत तिनं यामध्ये आणखी एका वादाला तोंड फोडलं.
शाहीन बाग आंदोलनाची खरी बाब जशी समोर आली होती, त्याचप्रमाणंच शेतकरी आंदोलनामागचाही खरा हेतू समोर येईल तेव्हा मी सर्वांसमोर येऊन नक्की बोलेन असा शब्दच मी दिला होता, असं म्हणत कंगनानं आपली बाजू मांडण्यास सुरुवात केल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे.
'गेल्या 10-12 दिवसांपासून आपल्याला ज्या प्रकारे भावनिक, मानसिक झुंडशाहीच्या धमक्या येत आहेत, बलात्काराच्या धमक्या येत आहेत हे पाहता मी या देशाला काही प्रश्न विचारणं हा माझा हक्कच आहे. खुद्द पंतप्रधानांनीच सारंकाही स्पष्ट करत कोणत्याही शंकेला वाव दिलेला नाही, की हे (शेतकरी) आंदोलन राजकीय हेतूनंच करण्यात आलं होतं. हे आंदोलनच राजकीय हेतूनं प्रेरित असल्यामुळं यात दहशतवाद्यांनीही सहभागी होण्यास सुरुवात केली होती', असं कंगना म्हणाली.
पंजाबमधील मूळ स्थिती काय आहे, याचं चित्र तिनं आपल्या वक्तव्यातून सर्वांसमक्ष उभं केलं. याविषयी सांगताना ती म्हणाली, 'मी पंजाबमध्ये राहिली आहे. जवळपास मी 99.9 टक्के अशा लोकांना ओळखते ज्यांना खलिस्तान नको आहे. त्यांना या देशाचं विभाजन करायचं नाहीये. कारण, ते भारतीय नागरिक आहेत. अरुणाचल प्रदेशपासून महाराष्ट्र आणि दिल्लीपर्यंत सारंकाही त्यांचं आहे. त्यांना हा देश एकसंध हवा आहे. ही सर्व मंडळी देशप्रेमी आहेत'.
देशातील नागरिकांना उद्देशून तिनं प्रश्न केला, 'मला दहशतवाद्यांशी अडचण नाही. देशाचं विभाजन करु इच्छितात त्यांचे हेतू मी जाणते. पण, सर्वसामान्य नागरिक कशा प्रकारे स्वत:ला इतरांच्या अधीन जाऊ देतात, अजाणतेपणानं तुम्ही परदेशी वर्चस्वाखाली येताच कसे?'
देशातील जनतेला उद्देशून प्रश्न करत कंगनानं पुन्हा स्वत:कडे सर्वांच्या नजरा वळवल्या. मी देशाबाबत वक्तव्य केल्या राजकारण करते असं अनेकांचं मत. पण, या दिलजीत दोसांज आणि प्रियांका चोप्रांनाही विचारा हे कोणतं राजकारण करत आहेत, असं म्हणत आपली नाराजी व्यक्त केली.
कंगना आणि दिलजीत दोसांज यांच्यामध्ये मागील काही दिवसांत शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरु अनेक खटके उडाले आहेत. याच पार्श्वभूमीवर दिलजीतला कलाविश्वातून काही कलाकारांनी पाठिंबा दिला आहे. तर, इथं कंगनाही तिच्या मतावर ठाम आहे. त्यामुळं कलाविश्वातही या कलाकारांमध्ये खडाजंगी पाहायला मिळत आहे.
का सुरु आहे हा वाद?
कंगना रनौत आणि दिलजीत दोसांज या दोघांमध्ये मागील दिवसांपासून शेतकरी आंदोलनाच्या मुद्दयावरुन ट्विटर वॉर सुरु आहे. एकीकडे कंगना शेतकरी आंदोलनाला विरोध करत आहे. तर दुसरीकडे दिलजीत मात्र शेतकऱ्यांना पाठिंबा देत कंगनावर सातत्यानं निशाणा साधत आहे. या दोघांमध्ये दोघांमध्ये सुरु असणाऱ्या ट्विट वॉरला आणखी एक वादग्रस्त वळण मिळालं आहे. दिलजीत शेतकऱ्यांना भडकवण्याचा प्रयत्न करतोय, असं म्हणतही कंगनानं त्याला डिवचण्याचा प्रयत्न केला होता. कंगनाच्या या आरोपांना दिलजीतनंही उत्तर देत शेतकरी तुला दहशतवादी वाटतात का? असा सवाल त्याने कंगनाला केला होता.