पंढरपूर : जालन्यापासून करमाळ्यापर्यंत दहशतीचा थरार निर्माण करणारा नरभक्षक बिबट्या अखेर इतिहासजम झाला आहे. टीम बारामतीच्या शार्प शूटर्सनी या बिबट्याची दहशत संपवली आणि करमाळ्यातील नागरिकांनी अखेर सुटकेचा निश्वास सोडला. डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या गोळीने बिबट्याचा वेध घेतला. वांगी नं.4 रांखुडे वस्तीवर पांडुरंग रांखुडे यांच्या केळीच्या बागेत बिबट्याला ठार करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून या नरभक्षक बिबट्यामुळे तालुक्यात दहशत पसरली होती.


हा थरार नेमका कसा होता हे सांगताना टीम बारामतीचे डॉ धवलसिंह मोहिते पाटील सांगतात की, गेल्या चार दिवसांपासून बिबट्याचा माग काढण्याचा प्रयत्न टीम बारामती करत होती. हा नरभक्षक बिबट्या वांगी परिसरात दिसल्याचे समजताच हर्षवर्धन तावरे यांनी रिस्क घेत पहाटेपासून सर्व केळीच्या बाग शोधायला सुरुवात केली होती. मात्र दुपारी चारच्या सुमारास हा बिबट्या राखुंडे वस्तीजवळील एका केळीच्या बागेत दिसल्याची पक्की खबर मिळताच टीम बारामतीचे हर्षवर्धन तावरे, धवलसिंह मोहिते पाटील आणि वन विभागाचे अधिकारी संजय कडू यांच्या टीमने या केळीच्या बागेला चारही बाजूने वेढले. मात्र बिबट्याकडून कोणतीही हालचाल होत नव्हती. दिवसही मावळायला लागल्याने तावरे यांनी धवलसिंह मोहिते पाटील यांना जीपच्या टपावर बसून केलीत घुसण्याच्या सूचना दिल्या आणि इतर बाजूने बाकीच्या शूटर्सनी पोझिशन घेतली. जीप हळूहळू केळीच्या बागेत घुसली. परंतु अंधार पडू लागल्याने बिबट्याचा शोध घेणे रिस्की आणि जिकिरीचे होऊ लागले होते. मात्र अचानक काही अंतरावर समोर बिबट्या दिसला. गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ असलेला बिबट्या अतिशय हायपर झाल्याचे दिसत असतानाच त्याने या जीपकडे हल्ला करण्यासाठी धाव घेतली. आणि तोच क्षण असा होता की थोडे जरी विचलित झालो असतो तर आज बिबट्याऐवजी आपला शेवट होणार, ही जाणीव होताच या अतिशय तगड्या बिबट्यावर धवलसिंह यांनी पहिली गोळी फायर केली जी त्याच्या डोक्याला लागली. मात्र तरीही तो पुन्हा उठून हल्ल्यासाठी येत असताना दुसरी गोळी त्याच्या छातीत मारल्यावर या बिबट्याची हालचाल मंदावली. पण रिस्क टाळण्यासाठी तिसरी गोळी मारल्यावर बिबट्या ठार झाल्याचा इशारा केला. सर्व शूटर आणि वन विभागाची दबा धरुन बसलेली टीम या जागी आली. बिबट्या ठार झाल्याचे नक्की झाल्यावर सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला.

हा थरार संध्याकाळी 5 वाजून 55 मिनिटांपासून 6 वाजून 5 मिनिटापर्यंत चालला. केवळ पंधरा फुटांवरुन फायर केल्याने अंधारातही योग्य जागी निशाणा लागल्याचे धवलसिंह मोहिते पाटील सांगतात. यावेळी मी कचरलो असतो तर याच बिबट्याची शिकार झालो असतो. हा बिबट्या अतिशय मजबूत आणि आक्रमक असल्याने त्याच्यावर नियंत्रण मिळवणे खूपच अवघड होतं, असंही ते म्हणाले.


या सर्व टीमचे नेतृत्व करणारे टीम बारामतीचे हर्षवर्धन तावरे यांनी नियोजन करुन बिबट्याला जायबंदी करायचे ठरवलेच होते. मात्र काल जर बिबट्या सुटला असता तर पुन्हा एखादी दुर्घटना करु शकला असता अशी भीती व्यक्त केली. हा बिबट्या ज्या पद्धतीने वांगी परिसरातील मानवी वस्तीजवळ पोहोचला होता, त्यावरुन काल त्याने नक्की हल्ला केला असता. त्यामुळेच त्याला काल जायबंदी करणे एवढे एकाच ध्येय ठेवून आमच्या टीमचे प्रयत्न असल्याचे सांगितले.


वास्तविक मानवी रक्ताची चटक लागलेला हा नरभक्षक बिबट्या दोन वेळा वनविभागाच्या हल्ल्यातून सुटल्याने करमाळा परिसरातील ग्रामस्थ संतप्त होते आणि त्यातूनच या टीम बारामतीची नेमणूक करण्यात आली होती. काल या बिबट्याची दहशत संपवून टीम बारामतीचे हर्षवर्धन तावरे आणि त्यांचे सर्व सहकारी रात्री उशिरा अकलूज येथे डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांचे निवासस्थानी पोहोचले. येथे इतक्या रात्रीही करमाळा आणि अकलूज परिसरातील ग्रामस्थ या टीमचे अभिनंदन करण्यासाठी पोहोचले होते.


संबंधित बातमी : 


नरभक्षक बिबट्याला मारण्यात अखेर वनविभागाला यश; धवलसिंह मोहिते पाटलांच्या गोळीने घेतला बिबट्याचा वेध 


दिवसभर प्रयत्न करुनही 'मिशन बिबट्या' फेल; एक फायर चुकवत नरभक्षक पसार


Cannibal Leopard | डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या तोंडून नरभक्षक बिबट्याला ठार केल्याचा थरार