मुंबई : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सावधगिरीचं पाऊल म्हणून सर्वत्र सक्तीची टाळेबंदी अर्थात लॉकडाऊन लागू करण्यात आलं. ज्यानंतर अनेक सेवा, पर्यटनस्थळं यांच्यावर या साऱ्याचे थेट पडसाद उमटले. (Konkan) कोकणच्या समुद्र किनाऱ्यांवर ठप्प असणारे वॉटर स्पोर्ट्स व्यवसाय हे त्याचच एक उदाहरण.


कित्येक महिन्यांपासून बंद असणारे वॉटरस्पोर्ट्स आता शासनाच्या नव्या एसओपीसह पुन्हा सुरु होण्याची चिन्हं असल्याची बातमी समोर आली आहे. त्यामुळं कोकणच्या दिशेनं येणाऱ्या पर्यटकांसाठी ही आनंदाची बातमी ठरत आहे. याशिवाय वॉटरस्पोर्ट्सचा व्यवसाय असणाऱ्यांसाठी हा एक मोठा दिलासा ठरत आहे.


कोकणातील किनाऱ्यांवर असणारे वॉटर स्पोर्ट्स लवकरच सुरु होणार आहेत. याबाबत मुख्यमंत्री आणि पर्यटनमंत्री सकारात्मक असल्याची माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली. यासाठीची रितसर नियमावली तयार करण्याचं कामही सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. ही अपेक्षित नियमावली तयार झाल्यानंतर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये वॉटरस्पोर्ट्स लवकरच सुरु होणार असल्याचं चित्र आहे.


'कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वॉटरस्पोर्ट्स बंद करण्यात आले होते. पण, आता ते सुरु करण्यात यावेत अशी वॉटरस्पोर्ट्स चालवणाऱ्यांची आणि कोकणात येणाऱ्या पर्यटकांचीही मागणी होती. या मागण्यांच्या विचार करत खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा यासंदर्भातील एसओपी तयार करण्याचे आदेश देत व़ॉटरस्पोर्ट्सला एक प्रकारे मंजुरीच दिली आहे', असं विनायक राऊत म्हणाले.



अनेकांच्या उपजिवीकेचा प्रश्न सुटणार


कोकणच्या किनारपट्टी भागात येणाऱ्या पर्यटकांची संख्या पाहता इथं पर्यटनावर अवलंबून असणाऱ्या व्यवसायांची संख्याही जास्त आहे. वॉटरस्पोर्ट्स हा त्यापैकीच एक व्यवसाय. त्यामुळं या व्यवसायाला पुन्हा चालना मिळाल्यास अनेकांच्याच उपजिवीकेचा प्रश्न सुटणार आहे.