मुंबई : 'मराठी नाटकाला केवळ भारतापुरतं मर्यादित न ठेवता त्याला जगभरात पोचवायचं आहे. म्हणूनत हा निर्माता संघ आता जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघ आहे. मराठी नाटकं, प्रेक्षक आणि लॉकडाऊन काळात अडचणीत सापडलेला प्रत्येक नाट्यकर्मी यांच्यासाठी काम करायचं आहे. शिवाय, मी विशिष्ट पक्षाशी संबंधित असलो तरी मी नाट्यनिर्माताही आहे. माझी अनेक वर्षं नाटकं व्यावसायिक रंगभूमीवर आहे. माझ्या राजकीय पक्षाचा कोणताही संबंध इथे नसेल. नाट्यसृष्टीच्या भल्यासाठी आम्ही सगळे काम करू त्यासाठी मला तुमची साथ हवी आहे', असं सांगत नव्या निर्माता संघाचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी आपली भूमिका मांडली.


व्यावसायिक नाट्य निर्माता संघाच्या सदस्यांना आर्थिक मदत करण्यावरून निर्माता संघात सुरू असलेलं राजीनामानाट्य अखेर नव्या निर्माता संघाच्या स्थापनेनं संपुष्टात आलं. सोमवारी नव्या संघाचे प्रवक्ते अनंत पणशीकर यांनी या नव्या संघाची जाहीर घोषणा करत नव्या कार्यकारिणीचीहो ओळख करून दिली. या नव्या संघाचे अध्यक्ष अमेय खोपकर असणार आहेत तर उपाध्यक्ष असतील महेश मांजरेकर. या संघाचं नाव जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघ असं असणार आहे, अशी माहिती अमेय खोपकर यांनी दिली.


लॉकडाऊन काळात रंगमंच कामगारांसोबतच निर्मातेही आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अनेक निर्मात्यांची नाटकं चालू असताना हा लॉकडाऊन आल्यानं नवा पेच उद्धबवला. यातून संघाकडे असलेल्या ठेवीपैकी 14 लाखांच्या निधीचं वाटप ज्या निर्मात्यांची नाटकं बंद बदली त्यांना करावं असा विचार समोर आला. परंतु जसा हा लॉकडाऊन वाढला तसा केवळ नाटकं बंद पडलेले निर्माते नव्हे तर संघाचे सदस्य असलेल्या अडचणीत सापडलेल्या निर्मात्यांनाही मदत करावी असा नवा सूर आला. यातून तत्कालीन पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्य यांच्यात मतांतरं निर्माण झाली. म्हणूनच अध्यक्ष अजित भुरे, विजय केंकरे, सुनील बर्वे, वैजयंती आपटे, चंद्रकांत लोकरे, दिलीप जाधव, श्रीपाद पद्माकर, अनंत पणशीकर या निर्मात्यांनी पदांचे राजीनामे देतानाच संघाच्या सदस्यत्वाचाही राजीनामा दिला.


या राजीनामा नाट्यानंतर निर्माता संघाच्या काळजीवाहू पदाधिकाऱ्यांनीही पत्रकार परिषद घेऊन संघ सोडून गेलेल्या सदस्यांवर आरोप केले. या मतांतरावर चर्चा होऊ शकली असती. परंतु ती न करता माध्यमांकडूनच माहिती दिली गेली असं सांगतानाच हा पळपुटेपणा असल्याचा आरोप निर्माता संघाने केला. त्यावर कोणतीही प्रतिक्रिया न देता राजीनामा दिलेल्या निर्मात्यांनी नव्या संघाची स्थापना केली आहे. त्याची आज रीतसर घोषणा झाली. या ऑनलाईन पत्रकार परिषदेला नवी कार्यकारिणी उपस्थित होती. शिवाय मराठी सिने, नाट्यसृष्टीतल्या अनेकांनी या नव्या संघाला शुभेच्छा दिल्या. यात कविता लाड, सुयश टिळक, निवेदिता सराफ, अतुल परचुरे, अवधूत गुप्ते, अजित परब, सचित पाटील, तेजश्री प्रधान, संकर्षण कऱ्हाडे, विशाखा सुभेदार, पुरुषोत्तम बेर्डे आदी अनेक कलावंतांचा समावेश होतो.


जागतिक मराठी नाट्यकर्मी निर्माता संघाचे प्रवक्ते अनंत पणशीकर यांनी या संघाची माहीती दिली. शिवाय कार्यकारिणीची निवडही सूचक अनुमोदक पद्धतीने याच पत्रकार परिषदेआधी झाली. नाट्यगृहं सुस्थितीत आणणं.., चांगल्या नाटकांना रसिकांपर्यंत पोचवणं.., सर्वांना सोबत घेऊन जाणं हीच इच्छा हा संघ स्थापन करण्यामागे असल्याचं सांगितलं. 'आम्हाला कोण चूक कोण बरोबर हे ठरवायचं नाही. त्या निर्माता संघाची आपली अशी विचारधारा आहे. आम्ही एका वेगळ्या विचारधारेने एकत्र आलो. तिथे राहून काही कामं होत नव्हती. मग अशावेळी आपणच ती का करू नयेत असा विचार आल्याने हा संघ स्थापन झाला. आता संघासमोरची उद्दीष्टे आदी यथावकाश आम्ही देऊ असं यावेळी नव्या संघाचे उपाध्यक्ष महेश मांजरेकर यांनी सांगितलं.


सल्लागार - लता नार्वेकर, प्रशांत दामले


कार्यकारिणी


अमेय खोपकर, अध्यक्ष
महेश मांजरेकर, उपाध्यक्ष
चंद्रकांत लोकरे, खजिनदार
दिलीप जाधव, कार्यवाह
श्रीपाद पद्माकर, सहकार्यवाह
अनंत पणशीकर, प्रवक्ता
नंदू कदम, सदस्य
सुनील बर्वे, सदस्य


संबंधित बातम्या :