मुंबई : व्यावसायिक नाट्यनिर्माता संघात मंगळवारी सकाळपासूनच मोठ्या घडामोडी घडायला सुरूवात झाली. सकाळी 11 वाजल्यापासूनच निर्माता संघात असलेल्या ज्येष्ठ निर्मात्यांनी राजीनामे द्यायला सुरूवात केली. सकाळी 11 वाजल्यापासून सुरू झालेला हा सिलसिला पुढे पाऊणतास चालू होता. विशेष बाब अशी की काही दिवसांपूर्वीच निर्माता संघाच्या अध्यक्षांनी राजीनामे दिल्यानंतर 4 जूनला मुदतपूर्व निवडणूक होणार हे जाहीर झालं होत. त्याआधीच हे राजीनामे आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.


मंगळवारी सर्वात पहिला राजीनामा दिला तो श्रीचिंतामणी नाट्यसंस्थेच्या लता नार्वेकर यांनी. त्यानंतर सुनील बर्वे, नंदू कदम, राकेश सारंग, प्रशांत दामले, श्रीपाद पद्माकर, चंद्रकांत लोकरे, दिलीप जाधव, महेश मांजरेकर यांनी आपल्या व्यावसायिक नाट्यनिर्माता संघाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यापूर्वी निर्माता संघाकडे असलेल्या मदतनिधीच्या वाटपावरून निर्माता संघात मतांतरं झाली होती. त्यानंतर निर्माता संघाचे अध्यक्ष अजित भुरे आपला राजीनामा दिला. त्यानंतर सुनील बर्वे, प्रशांत दामले, विजय केंकरे, वैजयंती आपटे यांनीही राजीनामे दिले. अर्थात पैकी दोघांनी ती परत घेतल्याचं वृत्त आहे. 4 ऑगस्टला निर्माता संघाची सर्वसाधारण सभा जाहीर करण्यात आली आहे. त्या सभेत नवी कार्यकारिणी जाहीर होणार आहे. यासंदर्भात काळजीवाहू कार्यवाह राहुल भंडारे यांनी माहीती दिली होती. त्यांनंतर पाच निर्मात्यांनी राजीनामे दिल्यावर आलेल्या वृत्ताचं खंडन करण्यासाठी त्याचसोबत आपली बाजू मांडण्यासाठी निर्माते राहुल भंडारे यांनी पत्रकार परिषदेचं आयोजनही केलं होतं. त्याच दिवशी ज्येष्ठ निर्माते गोविंद चव्हाण यांच्या निधनाचे वृत्त आल्यानंतर ही परिषद रद्द करण्यात आली. त्याच्या दुसऱ्याच दिवशी हे राजीनामा सत्र सुरू झाल्याने खळबळ उडाली.


या राजीनामा नाट्याला निर्माती लता नार्वेकर यांनी दुजोरा दिला. त्या म्हणाल्या, निर्माता संघातली रक्कम निर्मात्यांना देण्याला आमचा विरोध नव्हता, आमचं म्हणणं इतकंच होतं की ही रक्कम आपण कुणाला देतो आहोत. ज्या निर्मात्यांना ही रक्कम दिली जातेय त्याचा निकष काय आणि सर्वात शेवटी मदत कुणाला दिली त्याची यादी आम्हाला हवी इतकं साधं म्हणणं होतं. या सगळ्या गोष्टी कायद्याला धरून व्हायला हव्यात. त्या होत नव्हत्या म्हणून शेवटी राजीनामा द्यायचा आम्ही निर्णय घेतला.


सध्या राजीनामा दिल्यानंतर दोन दिवसांनी पुढची दिशा ठरवण्यात येणार आहे. निर्माता संघाची पालक संस्था म्हणवणाऱ्या नाट्यपरिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांच्याशी संपर्क साधला असता याबाबत नाट्यपरिषदेला काही कल्पना नसल्याने यावर भाष्य करणे टाळले.


राजीनामा दिलेले निर्माते


मराठी नाट्यव्यवसायिक निर्माता संघाच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून आज संस्थेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.


1) लताबाई नार्वेकर
2) श्रीपाद पद्माकर
3) नंदू कदम
4) राकेश सारंग
5) अनंत पणशीकर
6) चंद्रकांत लोहोकरे
7) सुनील बर्वे
8) प्रशांत दामले
9) महेश मांजरेकर
10)दिलीप जाधव


अध्यक्ष अजित भुरे, उपाध्यक्ष विजय केंकरे ह्यांनी आपल्या पदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा आधीच राजीनामा दिला आहे आणि खजिनदार वैजयंती आपटे ह्यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.


मदतीसाठी आलेले 1 कोटी 20 लाख दिले कुणाला?, नियामक मंडळ सदस्यांचा नाट्यपरिषदेला घरचा आहेर