Subodh Bhave Birthday: मराठी मनोरंजनसृष्टीत नाटक असो की सिनेमा, मालिका असो  की संगीत.. आपल्या सहज अभिनयामुळे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या सुबोध भावेनं आपली खास जागा या मराठी मनोरंजन विश्वात बनवली आहे. अभिजात भारतीय संगीत परंपरा मोठ्या पडद्यावर आणत कट्यार काळजात घुसली, बालगंधर्व, अशा कलाकृतींमुळे शास्त्रीय संगिताबद्दल घराघरात कुतुहल निर्माण केलं. नाटकातील कलाकृती मोठ्या पडद्यावर आणणाऱ्या या कलाकारानं केलेल्या काही उत्कृष्ट चित्रपटांवर नजर टाकूया..


सविता दामोदर परांजपे


१९८५ साली रंगमंचावर आलेलं सविता दामोदर परांजपे हे नाटक अनेक मराठी प्रेक्षकांच्या स्मरणात राहिलेलं नाटक.  अतृप्त वासनांच्या पूर्तीसाठी मुक्त न झालेल्या वाईट शक्ती जेव्हा एखाद्या जिवंत देखाचा ताबा घेतात तेंव्हा काय घडतं हे सांगणारं गुढ कथानक. पुरुषी भ्रमरवृत्तीला बळी पडलेल्या या नाटकातल्या बाईच्या वेदना थेट प्रेक्षकांच्या वर्मी लागतात. हीच कथा २०१८ साली मोठ्या पडद्यावर आणत पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनात ठसली.
एका गुढ कथानकाची पार्श्वभुमी असलेल्या नाटकाच्या कथेवर आधारित सिनेमा म्हणजे सविता दामोदर परांजपे. सुबोध आणि तृप्ती तोरडमल यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट गूढपटच म्हणावा लागेल. लग्नाला 8 वर्षे झालेलं जोडपं आणि त्यांच्या आयुष्यात कुसुमच्या मानसिक आजाराच्या रुपाने आलेले वादळ.. ही कथा प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात राहिली.


कट्यार काळजात घुसली


कट्यार काळजात घुसली हे पुरुषोत्तम दारव्हेकर लिखित एक मराठी लोकप्रीय नाटक आहे.  मराठी संगीत नाटकाच्या इतिहासात २४ डिसेंबर १९६७ या दिवशी हे नाटक जन्माला आहं. या नाटकाला एवढा प्रतिसाद होता की पहिला प्रयोग पाहून शेवटची लोकल पकडून घरी जाऊ या विचाराने आलेले प्रेक्षक दुसऱ्या दिवशीच्या लोकलने घरी गेले. सलग आठ तास या नाटकाचा प्रयोग सुरु होता. या नाटकातील सर्वच पदे प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली. हीच कलाकृती मोठ्या पडद्यावर आणत हिंदुस्थानी संगीत, संगीतातील घराणी, घराण्यांचा अभिनिवेश आणि दोन भिन्न घराण्यांच्या गायकांमधील संघर्ष हा ‘कट्यार’चा विषय घराघरात पोहोचला..


बालगंधर्व


सुबोध भावे या अभिनेत्याचा बालगंधर्व हा चित्रपट मोठा चर्चेत आलेला चित्रपट आहे. संगित नाटकातील नारायण श्रीपाद राजहंस म्हणजेच बालगंधर्व यांच्या आयुष्यावर आधारलेला हा चित्रपट २० व्या शतकातील एका कलाकाराच्या प्रतिभावान आणि तेजस्वी गायकीच्या प्रेमात पाडणारा आहे.


..आणि काशिनाथ घाणेकर


ज्या अभिनेत्याच्या नावावर नाटकाच्या तिकीटबारीवर हाऊसफुलचे बोर्ड लागायचे, ज्याच्या प्रवेशाने टाळ्यांचा कडकडाटानं नाट्यगृह दणाणून जायचं त्या मराठी रंगभूमीवरच्या सुपरस्टार डॉ काशिनाथ घाणेकर यांचा बायोपिक प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात राहिला. नाटक आणि सिनेमात उजवा कोण असा प्रश्न पुसण्याचा प्रयत्न करत कलाकृती उंची करण्याकडे कल असणाऱ्या सुबोधनं लोकप्रीय नाटकांना मोठ्या पडद्यावर आणण्याचा पायंडा रचत अभिनेता दिग्दर्शक आणि निर्माता अशा तिनही भूमिकांवर ठसा उमटवला आहे.


संगीत मानापमान


संगीत मानापमान हा सुबोधचा नवा चित्रपट हा ही एका प्रसिद्ध संगित नाटकाचं चित्रपटातलं पदार्पण आहे. सुबोधचा पहिला दिग्दर्शन केलेला कट्यार काळजात घुसली चित्रपट चांगलाच गाजला होता. आता त्याच धरतीवर सुबोध मराठी संगीत नाटकांमधलं अजरामर नाटकावर आधारित संगीत मानापमान हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे.