Delhi Ganesh: तमिळ चित्रपटसृष्टीतील अष्टपैलुत्वासाठी ओळखले जाणारे दिग्गज अभिनेते दिल्ली गणेश यांचे वयाच्या 80 व्या वर्षी निधन झाले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे चेन्नईत रामपूर येथील निवासस्थानी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांचा मुलगा महादेवन गणेश यांनी सोशल मीडियावरून ही माहिती शेअर केली आहे. अभिनेता दिल्ली गणेश यांच्या मुलाने इंस्टाग्रामवरून ही माहिती देत लिहिले की, 9 नोव्हेंबर रोजी रात्री 11 वाजता त्यांचे निधन झाले. त्याच्या वडिलांवर 11 नोव्हेंबर रोजी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
400 हून अधिक चित्रपटांमध्ये चार दशकाहून अधिक कारकीर्द गाजवलेले जेष्ठ अभिनेते दिल्ली गणेश तमिळ चित्रपटसृष्टीतील एक मोठे नाव होते. त्यांच्या सहाय्यक भूमिका आणि चित्रपटांमध्ये कॉमेडी, खलनायक अशा सर्वच पात्रांना प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे.
साऊथच्या अनेक दिग्गजांसोबत काम
गेल्या कित्येक वर्षांमध्ये साऊथच्या अनेक दिग्गजांसोबत आणि लोकप्रीय कलाकारांसोबत दिल्ली गणेश यांनी काम केले होते. रजनीकांत,कमल हसन आणि इतर अनेक तमिळ कलाकारांसोबत स्क्रीन शेअर करणाऱ्या दिल्ली गणेश यांनी 1976 मध्ये पहिल्यांदा चित्रपटात पाऊल टाकले. 1981 मध्ये गणेशने 'इंगम्मा महाराणी'मध्ये नायकाची भूमिका केली होती, परंतु सहायक अभिनेता म्हणून त्याच्या व्यापक कामामुळे त्याला घराघरात नाव मिळाले.
या पुरस्कारांनी गौरविण्यात आले
दिल्ली गणेश यांच्या तमिळ चित्रपटसृष्टीतील योगदानाला अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले. 'पासी' (1979) मधील अभिनयासाठी त्यांना तामिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कार विशेष पुरस्कार मिळाला. याव्यतिरिक्त, कलेतल्या त्यांच्या उत्कृष्टतेबद्दल त्यांना 1994 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री जे जयललिता यांच्या हस्ते प्रतिष्ठित कलामामणी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.