मुंबई : एक महानायक बी आर आंबेडकर या मालिकेच्या सेटवर कोरोना जाऊन पोहोचला आहे. अँड टीव्हीवर हिंदीमध्ये ही मालिका सुरु आहे. या मालिकेचं चित्रिकरण मुंबईत सुरू आहे. मात्र मालिकेच्या सेटवरच्या कलाकाराला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आल्यानंतर मालिकेचं चित्रिकरण थांबवण्यात आलं आहे.


मार्च महिन्यात चित्रिकरणावर बंदी आली. आधी सिनेमाघरं बंद झाली. नंतर मालिकांची आणि सिनेमांच्या चित्रिकरणावर बंदी आली. त्यानंतर कोरोनाने एक एक करत सगळ्यांना कुलुपबंद केलं. पण सगळ्यात आधी घाव बसला तो मनोरंजनसृष्टीवर. मनोरंजन ही माणसाची प्राथमिक गरज नाही हे लक्षात घेऊन लॉकडाऊन काढतानासुद्धा सगळ्यात शेवटी विचार होईल तो या मनोरंजनसृष्टीचा, असं वाटत असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या इंडस्ट्रीला सुखद धक्का दिला. सलग दोन महिने बंद पडलेली इंडस्ट्री अटी शर्तींसह चालू लागली.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कलाकार, निर्माते आदींशी ऑनलाईन चर्चा करून काही अटी घालून दिल्या. त्यानुसार चित्रिकरणाला परवानगी देण्यात आली. त्याबद्दल संपूर्ण इंडस्ट्रीने मुख्यमंत्रीआणि त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानले आणि अटी शर्तींसह मालिकांच्या चित्रिकरणाला सुरूवात झाली. ही सुरूवात होऊन काही दिवस उलटतात ना उलटतात तोच ज्याची भीती होती तीच गोष्ट घडली आहे. एंड टीव्ही या चॅनलवरून दाखवल्या जाणाऱ्या एक महानायक बी आर आंबेडकर या मालिकेच्या सेटवर कोरोना जाऊन पोहोचला आहे.


ज्येष्ठ कलावंतांना सेटवर परवानगी नाहीच, नियम-अटीत बदल करुन नवा अध्यादेश जारी


या मालिकेचं चित्रिकरण मुंबईत सुरू आहे. दादासाहेब फाळके चित्रनगरी अर्थात फिल्मसिटी गोरेगाव इथे या मालिकेच्या चित्रिकरणाला सुरूवात झाली. आणि रविवारी या मालिकेतल्या कलाकाराला कोरोनाचं निदान झालं आहे. या कलाकाराचं नाव आहे जगन्नाथ निवंगुणे. या मालिकेत बाबासाहेबांच्या वडिलांची भूमिका ते साकारतात. जगन्नाथ हे मराठी कलाकार असून अनेक मालिका, सिनेमांमधूनही ते झळकले आहेत. संपूर्ण काळजी घेऊनही कोरोनाची लागण झाल्यामुळे सेटसह अनेकजण बुचकळ्यात पडले आहेत. जगन्नाथ निवंगुणे सध्या वरळी इथे उपचार घेत असून ते सुखरूप आहेत. ते क्वारंटाईन असूनच डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ते असल्याचं कळतं. त्यांना झालेल्या कोरोनात कोणतीही लक्षणे आढळलेली नाहीत. त्यांना कसलाही त्रास होत नसून काळजीचं कारण नसल्याचं कळतं.


अभिनेते निवंगुणे सेटवर आपल्या गाडीने येतात. सर्व दक्षता घेऊन चित्रिकरण करतात आणि त्यानंतर पुन्हा आपल्या गाडीनेच घरी जातात. कमीतकमी लोकांच्या संपर्कात येण्याचा त्यांचा अट्टहास असतो. एबीपी माझाशी बोलताना निवंगुणे यांनी कोरोनाचं निदान होण्याला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले, मी वरळीत इथे सुखरूप आहे. डॉक्टरही माझी काळजी घेत आहेत. कोरोना होऊ नये म्हणून आपण सगळेच काळजी घेत असतो. तशी मीही घेतली. पण आता हे कसं काय झालं काही कळलं नाही. पण काळजीचं कारण नाही.


कोल्हापुरात मालिका चित्रिकरणाचा पुनश्च हरिओम!, 'तुझ्यात जीव रंगला'च्या शुटिंगला सुरुवात


निवंगुणे यांना कोरोनाचं निदान झाल्यानंतर एक महानायक.. बी.आर. आंबेडकर या मालिकेचं चित्रिकरण तत्काळ थांबवण्यात आलं आहे. अचानक कोरोनाची लागण झाल्यामुळे सेटवरही तणावाच वातावरण आहे. अर्थात आता चित्रिकरण बंद करण्यात आलं आहे. निवंगुणे यांच्या संपर्कात आलेल्या काही लोकांच्या टेस्ट करण्यात येणार असल्याचं कळतं. सध्या या मालिकेच्या सेटवर जवळपास 40 लोक असतात. ही सगळी मंडळी वेगवेगळ्या ठिकाणांहून येत असतात, आता कुणामुळे कसा कोरोना आला ते काही कळायला मार्ग नाही असंही बोललं जात आहे.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनोरंजन सृष्टीच्या भल्यासाठी तातडीने पावलं उचलत निर्णय घेतला आहे खरा. परंतु कोरोनाची लागण काही कुणाच्या हातात नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. सध्या सर्वच हिदी आणि मराठी मनोरंजन वाहिन्यांच्या मालिकांच्या चित्रिकरणाला सुरूवात झाली आहे. अनेक मालिका आता येत्या 13 तारखेपासून नव्याने दिसायला सुरूवात होईल. असं असताना नव्याने मांडलेला हा डाव कोरोनामुळे पुन्हा बंद करायला लागला तर मात्र अडचणीचं ठरू शकेल. कारण, पुन्हा या मालिकांची चित्रिकरणं थांबवायला लागतील आणि त्याचा थेट परिणाम हा प्रसारणावर होणार आहे.